शब्बास मर्दा.... 'तो' थेट दवाखान्यातून अ‍ॅम्बुलन्समध्ये बसून गेला परीक्षा केंद्रावर....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

विद्यार्थी अभ्याचा ताण दूर करण्यासाठी क्रिकेट खेळायला गेला अन् खेळताना दुर्देवाने त्याचा पाय मोडला. आता परिक्षेचं काय होणार ? असा प्रश्न त्याला पडला.

कोल्हापूर -  सध्या दहावी बारावीच्या परिक्षांचा माहोल आहे.विद्यार्थी रात्र दिवस अभ्यासाला लागलेले आहेत, परंतु सतत अभ्यास करुन आलेला कंटाळा दूर करण्यासाठी विरंगुळा म्हणून विद्यार्थी विविध पर्याय अवलंबतात.असाच एक विद्यार्थी अभ्याचा ताण दूर करण्यासाठी क्रिकेट खेळायला गेला अन् खेळताना दुर्देवाने त्याचा पाय मोडला. आता परिक्षेचं काय होणार ? असा प्रश्न त्याला पडला. पण पायावर उपचार झाल्यानंतर प्लास्टर बांधलेल्या अवस्थेतच तो थेट रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रावर आला आणि त्या विद्यार्थ्यांने पेपरही दिला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील पारेवाडी गावात ही घटना घडलीय. या अवस्थेतही परिक्षेसाठी जाणाऱ्या या धडपड्या विद्यार्थ्याचं सर्वांनी कौतुक केलंय.

ललितच्या पायाला गंभीर दुखापत झाली

पारेवाडी मधला ललित निकम हा विद्यार्थी सध्या बारावी विज्ञान शाखेमध्ये शिकतोय. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून रविवारी संध्याकाळी ललित मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी बॉल पकडताना त्याची आणि दुसऱ्या खेळाडूची जोरदार धडक झाली. यात ललितच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मित्रांनी त्याला तात्काळ दवाखान्यात आणले. पण पायाचे हाड मोडल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या.

थेट दवाखान्यातून रुग्णवाहिकेत बसून परीक्षा केंद्रावर

डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं पण सोमवारी ललितचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. त्यानंतर परीक्षा विभागाशी संपर्क साधून त्याला स्वतंत्र कक्षात पेपर सोडण्याची परवानगी मिळाली.मग त्याच्यावरची शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर सोमवारी तो थेट दवाखान्यातून रुग्णवाहिकेत बसून परीक्षा केंद्रावर आला. त्याला बेंचवर बसता येत नसल्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती आणि यापुढचे सगळे पेपर तो रुग्णवाहिकेतून येऊन देणार आहे.

वाचा - येथे माकडे फोडतात वाहनांचे आरसे... 

काळजी घेणे गरजेचे

सध्या परिक्षांचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी खरं तर काळजी घेणे गरजेचे आहे मनोरंजन, खेळ हे करत असतानाच अपघात होऊ नयेत याची खबरदारी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही घेणे गरजेचे आहे. असं मत शिक्षकांनी व्यक्त केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The student went to the exam center by ambulance