
कोल्हापूर : सरकारी नोकरभरती बंद झाल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थी माघारी परतले आहेत. नोकरभरती बंद झाल्याची बातमी ऐकून अनेक विद्यार्थ्यानी अभ्यास करणे बंद केले आहे.
पारंपारिक शिक्षणाच्या वाटेतून नोकरीचे दरवाजे बंद झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेकडे वळले. पीएसआय, एसटीआय, नायब तहसिलदार, तहसिलदार तसेच जिल्हा परिषद, ट्रेझरी, आरोग्य विभागातील नोकर भरती विद्यार्थ्यांसाठी आधार होती. आरोग्य तसेच पोलिस भरती सोडून अन्य भरतीवर वर्षासाठी बंदी घातली गेली आहे. यात पोलिस भरतीपेक्षा आरोग्याला प्राधान्य दिले गेले आहे. जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांघकाम विभाग, जिल्हा परिषद, धर्मादाय, तसेच "ब' गटातील विविध पदे यामुळे भरली जाणार नाहीत.
राज्यभरातून दरवर्षी सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी परीक्षेस सामोरे जातात. कोल्हापूर जिल्ह्यात हीच संख्या तीस ते चाळीस हजार इतकी आहे. राज्यभरातील संख्येत वर्षाला किमान दहा टक्क्यांची भर पडते. कोल्हापूर जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण झाले तसे अलिकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था निर्माण झाल्या.
ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या संख्येने शहराकडे स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने वळले. घरगुती खानावळीपासून ते खोली भाड्याने घेऊन ज्या भागात विद्यार्थी वास्तव्यास राहिले तेथे पॅरेलल इकॉनॉमी उभी राहिली. लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थी संबंधित शहरात अडकून पडले तर काही जण गावी निघून गेले. गेल्या महिन्यात होणारी परीक्षाही पुढे ढकलली गेली. लॉकडाऊन उठल्यानंतर परीक्षेच्या तारखा जाहीर होतील या आशेवर विद्यार्थी होते. मात्र, आर्थिक संकटामुळे सरकारी नोकरभरतीच बंद झाल्याने अभ्यास करून करायचे तरी काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
आर्थिक कारणामुळे सरकारी नोकरभरती होणार नसली तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासात खंड पाडू नये. भरतीवरील स्थगिती आज ना उद्या उठेल मात्र विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. राज्यसेवा नसली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून संधी मिळू शकते. इतकी वर्षे मेहनतीने अभ्यास करत आहात तो तसाच सुरू ठेवा.
- ज्ञानदेव भोपळे, स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक
शासनाच्या तिजोरीत पैसे नसतील तर शासन नोकरभरती करून करणार तरी काय? पण हे ही दिवस जातील. भरतीची जाहीरात कधीही निघू शकते. त्यामुळे अभ्यास सोडून देऊ नका. किबहुना लॉकडाऊनचा काळ ही संधी समजून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
- शशिकांत बोराळकर, स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.