प्रवेशाअभावी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

Students Waiting For The Admission Process Kolhapur Marathi News
Students Waiting For The Admission Process Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्याचा परिणाम अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. शेवटच्या टप्प्यात आलेली प्रक्रिया स्थगित करण्याची वेळ आली. वीस दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांच्याकडून प्रवेशाबाबत विचारणा केली जात आहे. शासनाच्या निर्णयाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. 

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी गेल्या तीन वर्षांपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यंदाही त्याचीच अंमलबजावणी केली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली. 10 महाविद्यालयातील एक हजार 660 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. अर्ज दाखल करण्यास एक वेळ मुदतवाढही दिली. एकूण एक हजार 220 अर्ज दाखल झाले होते. छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर 8 सप्टेंबरला प्रवेशाची अंतिम यादीही प्रसिद्ध झाली होती. विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबतचे "एसएमएस'ही पाठविले. 

पण, सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. महाविद्यालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची वेळ आली. त्याला 20 दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, कोणताच निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांच्याकडून प्रवेशाबाबत विचारणा होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मूळात महाविद्यालये बंद आहेत. त्यात प्रवेश अधांतरी राहिल्याने अडचण निर्माण झाली आहे. आरक्षणाबाबत शासन काय निर्णय घेते त्यावर प्रवेश प्रक्रिया अवलंबून आहे. 

प्रवेशच नसल्याने शिक्षण बंद... 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही थांबलेला नाही. त्यावर पर्याय म्हणून शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू धोरण अवलंबले. शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविणे सुरू केले आहे. मात्र, अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेशच झालेले नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. परिणामी, महाविद्यालयही बंद आणि शिक्षणही बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com