गोकूळच्या सत्तारूढ गटा विरोधातील पालकमंत्र्यांच्या पहिल्या लढाईला यश
कोल्हापूर ः जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ गटातील पाच ते सहा संचालकांना फोडण्याबरोबरच जिल्ह्यात मातब्बर नेत्यांना एका झेंड्याखाली आणण्याच्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पहिल्या लढ्याला यश आले आहे. आता उमेदवारी देतानाच त्यांचा खरा कस लागणार आहे. यावर ते कसे मात करतात, यावर लढाईचे चित्र अवलंबून आहे.
तब्बल पाच विद्यमान आमदार, त्यात तीन मंत्री, एक खासदार, तीन माजी आमदार आणि "गोकुळ'चे किमान सहा विद्यमान संचालकांना एकत्र करून सत्ताधाऱ्यांविरोधात पालकमंत्री पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. तशी त्यांनी ही तयारी पाच वर्षापासून केली आहे. "गोकुळ' मल्टीस्टेट करण्यावरून सुरू केलेल्या या लढ्यात त्यांच्यासोबत पहिल्यापासून असलेले काही नेते आताही त्यांच्यासोबत आहेतच. शिवाय माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, ज्येष्ठ संचालक अरूण डोंगळे, विश्वास पाटील, जयश्री पाटील-चुयेकर व आणखी किमान दोन विद्यमान संचालकही आपल्याकडे खेचण्यात त्यांनी यश मिळवले आहे. घडामोडीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी बाजी मारली असली तरी आता उमेदवारी देताना कोणाला किती जागा द्यायच्या हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असेल.
गतनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत असलेले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी विरोधी आघाडीचे नेते आहेत. त्यांच्यासह त्यांच्याबरोबर आलेले माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांना काही जागा द्याव्या लागतील. गेल्या निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांनी माजी संचालक बाबासाहेब चौगले, अंबरिष घाटगे व चंद्रकांत बोंद्रे हे प्रस्थापित वगळता सामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली. या सामान्य उमेदवारांनीच सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. आता तशीच परिस्थिती राहील का नाही, हे सांगता येत नाही. कारण नेते मंडळी जास्त आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या जागांचा मेळ घातला तर निर्माण होणारी नाराजी हाही त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न असेल.
सत्तारूढ गटाला सोडून आलेले विद्यमान संचालक हे मतांचा गठ्ठा असलेले आहेत. त्यामुळे त्यांना डावलणे अशक्य आहे. त्याचवेळी प्रत्येक नेत्यांना एक-दोन जागा द्यायच्या म्हटल्या तरी गेली पाच वर्षे सत्तारूढ गटाविरोधात रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचेही आव्हान विरोधी आघाडीसमोर असेल. गेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष चिठ्ठीच्या माध्यमातून व्यक्त झाला होता. त्यात तेच तेच चेहरे किती दिवस बघायचे, भाकरी परता आणि आम्ही परतवू अशा इशारा काही मतदारांनी चिठ्ठीद्वारे दिला होता. उमेदवार ठरवाताना याचाही विचार करावा लागणार आहे.
पाच वर्षापूर्वी मतदार असलेल्यांपैकी जवळपास 50 टक्के ठरावदार बदलले आहेत. गेल्या निवडणुकीत विरोधात गेलेल्यांची नावे यातून जाणीवपूर्वक वगळण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आहे. शिवाय यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे 400 मतदार वाढले आहेत. मतदार वाढवताना सत्तारूढ गटाने आपल्याला मानणाऱ्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या संस्थांचीच नोंदणी करून घेतली आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे.
महाडिकांविरोधात मोट
गेल्या बारा वर्षापासून महादेवराव महाडिक विरूद्ध सतेज पाटील असा उघड संघर्ष सुरू आहे. यातूनच पाटील यांनी "गोकुळ'मध्ये महाडिकांविरोधात मोट बांधण्याचा चंग बांधला होता. त्यात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांबरोबरच राज्याच्या राजकारणात भाजपासोबत असलेले आमदार विनय कोरे यांनाही सामावून घेत ही मोट पाटील यांनी अधिक मजबूत केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारीविरुद्ध विरोधक यापेक्षा महाडिक विरूद्ध सतेज असाच संघर्ष पहायला मिळेल.
......
चौकट
संभाव्य जागा अशा
*पालकमंत्री सतेज पाटील - 4 ते 5
*ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ - 2
*आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर - 2
*आमदार विनय कोरे- 2
*माजी आमदार चंद्रदीप नरके- 2
*खासदार संजय मंडलिक - 1
*आमदार राजेश पाटील- 1
*आमदार प्रकाश आबिटकर - 1
*माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर- 1
*माजी आमदार के.पी.पाटील- 1
*ए. वाय. पाटील - 1
*संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, जयश्री पाटील-चुयेकर- प्रत्येकी 1
*गोपाळराव पाटील - 1
---
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.