चंदगड तालुक्‍यात स्थानिक आघाड्यांना कौल 

सुनील कोंडुसकर
Monday, 18 January 2021

चंदगड तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती

चंदगड : तालुक्‍यातील 33 ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल आज येथे जाहीर करण्यात आला. 41 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती त्यापैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या 33 ग्रामपंचायतींसाठी मतदान होऊन आज निकाल लागला. दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडले तर उर्वरित 31 ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाड्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील प्रशासकीय भवन मध्ये मतमोजणी झाली. जसजसा निकाल जाहीर होईल तसे निवडून आलेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. 

एक मतांनी विजय 
देवरवाडी येथे बसवंत कांबळे 1 मतांनी विजयी ठरले. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी संजय कांबळे यांना 141 मते पडली तर बसवंत यांना 142 मते मिळाली. 

कांचन मनोळकर चिठ्ठीवर विजयी 
शिनोळी खुर्द येथील कांचन नारायण पाटील व कांचन परशराम मन्नोळकर यांना समान 254 मते पडली. चिठ्ठीवर काढलेल्या निकालात मन्नोळकर विजयी झाल्या. 

निवृत्त कर्मचारी झाला सदस्य 
इब्राहिमपूर ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी गणपती गुंडू पानोरे या निवडणुकीत विजयी ठरले. अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी ते सेवानिवृत्त झाले. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला आणि ते निवडून आले. 

सेवाभावी डॉक्‍टर पराभूत 
तुडिये येथील डॉ. रमेश पाटील पराभूत झाले. त्या विभागात गोरगरिबांची निःशुल्क सेवा करणारे डॉक्‍टर म्हणून ख्याती आहे. राजकारणात पर्याय द्यायचा म्हणून त्यांनी उमेदवारी केली होती. परंतु जनतेने त्यांना नाकारले. त्यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला. 

पती-पत्नी विजेते 
हलकर्णी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकला. विजयी उमेदवारांत मष्णू ऊर्फ राहुल गावडा व त्यांच्या पत्नी रचना विजयी झाल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य भरमाणा गावडे यांचे ते पुत्र व सून होत. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Of Local Alliances In Chandgad Taluka Kolhapur Marathi News