Video: कोल्हापुरात आहे अस एक गाव जिथे महिलांनी आणली शांतता आणि आरोग्याची क्रांती!

बी. डी. चेचर 
Sunday, 3 January 2021

न्यू राजापूरने दिला आदर्श; ‘किर्लोस्कर ऑईल’ व ‘स्वयंसिद्धा’चे मार्गदर्शन

कोल्हापूर:  माणसाला शांतता आणि आरोग्यदायी क्रांती हवी असेल तर आयुष्यात आयुष्यापेक्षा काहीही मोठं नाही, याचाच विचार सध्या रुजत आहे. याच पार्श्‍वभूमीवर सकारात्मक विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनी व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनतर्फे सुरू असलेल्या ग्रामीण पुनर्रचना विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दूधगंगा प्रकल्प वसाहत न्यू राजापूर (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसित गावातील महिलांना सक्षम करून स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याला व अर्थकारणाला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) हद्दीत असलेल्या न्यू राजापूर येथील लोकसंख्या केवळ सातशे. पण, या गावातील महिलांनी तीन वर्षे जागृती, प्रशिक्षण, स्वयंनिर्भरता मार्गाने गावाला स्वयंपूर्ण बनवत आहेत. त्यासाठी ‘स्वयंसिद्धा’ने गावातील सर्व महिलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून ‘महिला बदलल्या तर घर बदलेल त्याचबरोबर गावही बदलेल’ असा विचार येथे रुजविला आहे. 

हेही वाचा- कोल्हापूरात वर्षभरात पाईपलाईनने मिळणार गॅस -

कोरोनाच्या काळातही येथील महिलांनी सेंद्रिय भाजी, कुकुटपालन, खिलार गाय पालन, इमिटेशन ज्वेलरी, शेवयाचे पाच प्रकार, गांडूळ शेती, बॅगा निर्मिती, सोया प्रोडक्‍टस, फॅशन डिझायनिंग, यासारख्या छोट्या उद्योगाची निर्माती केली. 
कोरोनामुळे गावातील पुरुष व तरुण घरीच थांबल्याने तेथील लोकांना पोषणबागेने हात दिला आणि महिलांनी घर -मुलं सांभाळत आपल्या अंगणात-परड्यात आरोग्यदायी सेंद्रीय भाजीचे प्रयोग सुरु केले आणि ते यशस्वी केले. त्यामुळे महिन्याला किमान दोन हजाराचे उत्पन्न मिळू लागल्याने तितकीच बचतही झाली आणि चांगल्या प्रतिची भाजी गावाला मिळूलागली. कोरोनासारखी कोणतीही आपत्ती आली तर न डगमगता शेतीपुरक उद्योगाकडे लक्ष दिले तर चरितार्थ चालवण्याइतकी कमाई कुंटुंबाला होवू शकते, याचा आत्मविश्‍वास न्यू राजापुरने मिळविला आहे. 

किर्लोस्कर ऑईल व डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून २०१९ पासून ग्रामीण पुनर्रचना विकास या अंतर्गत न्यू राजापूर येथील महिलांना ज्ञान आणि माहितीच्या आधारे घरगुती व्यवसाय व विषमुक्त शेतीवर भर दिला आहे. गावातील लोकांचे आरोग्य उत्तम करण्याचा ‘स्वयंसिद्धा’चा प्रयत्न आहे. 
- वैजयंती पाटील, सेंद्रीय शेती मार्गदर्शक 

संपादन-अर्चना बनगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story hatkanangale new rajapur village