वेळेत उचल नसल्याने उत्तूर परिसरात उसाला तुरे 

अशोक तोरस्कर
Monday, 25 January 2021

शेतकऱ्याच्या हक्काचा आजरा साखर कारखाना बंद पडला आहे. उसाची वेळेत उचल न झाल्याने त्याला पांढरे तुरे आले. परिसरात 250 हेक्‍टर उसापैकी 150 हेक्‍टर ऊस शिल्लक आहे.

उत्तूर : शेतकऱ्याच्या हक्काचा आजरा साखर कारखाना बंद पडला आहे. उसाची वेळेत उचल न झाल्याने त्याला पांढरे तुरे आले. परिसरात 250 हेक्‍टर उसापैकी 150 हेक्‍टर ऊस शिल्लक आहे. तुरे फुटलेल्या उसाची लवकर उचल नाही झाली तर वजन घटून शेतकऱ्याचे नुकसान होईल. 

या परिसरात 80 टक्के शेतकरी लवकर तयार होणाऱ्या (अर्ली व्हरायटी) 86032 या जातीच्या ऊस पिकाची लागवड करतात. 11 महिन्यांत हा ऊस पक्व होतो. या पिकाची लावण, खोडवे, निडवे ठेवले जाते. कमी पाण्याचा ताणही हे बियाणे सहन करते. 9 ते 10 पेरे येतात. यामुळे या जातीच्या लागवडीस जास्त पसंदी शेतकरी देतात. साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. अजून तो तीन महिने चालेल.

मध्यंतरी पडलेला अवकाळी पाऊस, ऊस नेण्यासाठी वाट नाही, बंद असलेला आजरा कारखाना, ऊस तोडणाऱ्या टोळींची कमतरता अशी कारणे आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. बहुतांश उसाला आता पांढरे तुरे फुटले आहेत. 

शेतकऱ्यांचे नुकसान
उसाची वाढ खुंटून तो कमी उंचीवर पक्व झाला की तुरे येण्यास सुरवात होते. तुरे फुटल्याने वजन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. 
- प्रशांत पोतदार, ऊस उत्पादक 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane Cultivation In Uttur Area Is In Trouble Due To Untimely Lifting Kolhapur Marathi News