जयंत पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा, त्यात गैर काय?, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.त्या आज कोल्हापुर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.

कोल्हापूर : जर अजितदादांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अजित दादांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.त्या आज कोल्हापुर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.

इस्लामपूरमध्ये एका स्थानिक केबल वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाविषयीची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली.तसेच सोशल मिडीया वर ही या निमित्ताने  जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री होण्याचे सर्व गुण तुमच्यात आहेत, पण तरीही मुख्यमंत्री पद आपणास हुलकावणी देत आहे, असे वाटत नाही का किंवा मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर जयंत पाटील म्हणाले होते, 'आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्री पद आलेले नाही. तसेच प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. तसे मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते,  शरद पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असतो, असे स्पष्ट करत आपल्या मनातील सुप्त भावना पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या.

कृषी कायद्याच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'केंद्र सरकार या प्रश्नाबाबत असंवेदनशील आहे. केंद्र सरकार केवळ बैठकांचा दिखावा करत असल्याची टीका ही त्यांनी केली.थंडी, पाऊस या प्रतिकुल परिस्थितीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांबाबत सरकारसह पोलिस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध सुळे यांनी व्यक्त  केला.भाजपच्या या असंवेदनशील भुमिकांमुळेच त्यांचेच अनेक नेते पक्ष सोडत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जेष्ठ नेते शरद पवारांच्या समवेत सुप्रिया सुळेही कोल्हापुरच्या दौऱ्यावर आल्या आहेत.कोल्हापुरात विविध ठिकाणी त्या भेटी देणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya sule press conference in kolhapur political news latest news