अंबाबाई मंदिरातील सेवेकऱ्यांची सूर सेवा

 Sur Seva of Ambabai temple servants
Sur Seva of Ambabai temple servants

कोल्हापूर, ः करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज पहाटेपासून त्यांच्या सेवेला प्रारंभ होतो... सनईची सेवा इमाने-इतबारे बजावणारा अमित साळोखे त्यांच्या पाचव्या पिढीचा प्रतिनिधी. अंबाबाईच्या खजिन्याचा रखवालदार महेश खांडेकर, तर त्यांच्या अठराव्या पिढीचा प्रतिनिधी... ही सारी मंडळी आता एकवटली आहेत आणि आपापली सेवापरायणता जपत देवीसमोर रोज दुपारी त्यांच्या भजनाचे सूर उमटू लागले आहेत. यंदा मंदिर भाविकांसाठी बंद आहे आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले आहेत. त्यामुळे ललिता पंचमीचा अपवाद वगळता उत्सव काळात रोज ही मंडळी भजनात तल्लीन होणार आहेत. त्यांच्या या भजनाच्या सुरांनी मात्र उत्सवाला आणखी उंची लाभणार आहे. 
लॉकडाउनच्या काळात रोज ही मंडळी मंदिरात असायची. अमितला संगीताची चांगली जाण. किंबहुना त्याचं शिक्षण याच विषयातलं. त्याच्यासह प्रमोद धर्माधिकारी, भारत पारकर यांनी मग मंदिरात फावल्या वेळेत भजनाला सुरवात केली. हळूहळू मंदिरातील इतर मंडळीही त्यात सहभागी होऊ लागली. लॉकडाउनच्या काळात पुढे मग त्यांचा हा नित्यनेमच बनला. पण, जूनमध्ये पाऊस सुरू झाला आणि त्यात कधी-कधी खंड पडू लागला. यंदाचा नवरात्रोत्सव भाविकांविना साजरा होत आहे. कालचा उत्सवाचा पहिला दिवस सर्वांसाठीच धावपळीचा होता. मात्र, आज पुन्हा या मंडळींनी मंदिरात भजनाला प्रारंभ केला. सोशल डिस्टन्स ठेवत रोज दुपारी दीड तास ही मंडळी भजनात रमतात. केदार स्वामी, ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, ऋषीकेश चरणकर, अनिरुद्ध जोशी यांच्यासह मंदिरातील मंडळी आपापले काम सांभाळून त्यात सहभागी होऊ लागली आहेत. 

अमितला करायचीय "पीएच.डी.' 
मंदिरात सनईवादन करणारा अमित गेल्या वर्षी यूजीसी नेट परीक्षा संगीतशास्त्र विषयात उत्तीर्ण झाला. त्याने हार्मोनियमचेही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता त्याला याच विषयात "पीएच.डी.' करायची आहे. तो सांगतो, ""भजन आणि विशेषतः संगीताची आवड असणारी आम्ही सारी मंडळी आहोत आणि भजनाच्या माध्यमातून देवीची आराधना करीत आहोत.'' 

उत्सव काळात 80 हून अधिक कार्यक्रम 
प्रत्येक वर्षी उत्सव काळात 80 हून अधिक कार्यक्रम मंदिरात सादर होतात. रोज सकाळी सातपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. विविध मंत्र आणि स्तोत्रपठणाबरोबरच रोज किमान सात ते आठ सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. त्यात भजनाबरोबरच नृत्याविष्कार आणि भाव-भक्तिगीतांच्या कार्यक्रमांचा समावेश असतो. मात्र, यंदा हे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर रोज दुपारी रंगणारे भजन मात्र साऱ्यांनाच भक्तिरसात न्हावून टाकणार आहे. 
- संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com