त्यावेळी मोदी पंतप्रधान असते तर देशाची काय अवस्था झाली असती..?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 March 2020

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘निसर्गाला त्रास न देणारा बळीराजा आहे. त्याचा समतोल राखण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. तरीही पर्यावरणाच्या बदलाची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागते. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होते.

गडहिंग्लज - पर्यावरण आणि शेतीचा जवळचा संबंध आहे, साहाजिकच पर्यावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर होतो, या बदलाला चंगळवादी प्रवृत्ती कारणीभूत असताना त्रास मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, शेतकऱ्यांचे हेच प्रश्‍न घेऊन पर्यावरण परिषद घेतली जाणार आहे. त्याची सुरुवात गडहिंग्लजमधून होईल. पुढील टप्प्यात त्याला राज्यव्यापी स्वरूप दिले जाणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 
श्री. शेट्टी गडहिंग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, केंद्र शासनाचे शेतीविषयक धोरण, संघटनेच्या कार्यकारणीची फेररचना याबाबत त्यांनी भूमिका मांडली.

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘निसर्गाला त्रास न देणारा बळीराजा आहे. त्याचा समतोल राखण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. तरीही पर्यावरणाच्या बदलाची शिक्षा शेतकऱ्यांना भोगावी लागते. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होते. शेतकऱ्यांचे हेच सारे प्रश्‍न घेऊन पर्यावरण परिषद होणार आहे. शेतकऱ्यांना पर्यावरणाबाबत प्रबोधित केले जाणार आहे. शिवाय या परिषदेत महाविद्यालयीन विद्यार्थी, पर्यावरणप्रेमींसह समाजातील अन्य घटकांनाही सामावून घेणार आहोत. मे महिन्यात ही परिषद घेतली जाईल.’’

ते म्हणाले, ‘‘मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी शेतीच्या पायाभूत सुविधांवर लक्ष दिले होते. त्यामुळे जीडीपी सर्वोच्च पातळीवर पोचला होता. जागतिक मंदीतून देश तरला होता. आताचे पंतप्रधान मोदींचे लक्ष केवळ रस्ते आणि बुलेट ट्रेन यांच्यावरच आहे. त्यावेळी मोदी पंतप्रधान असते तर आता देशाची काय अवस्था झाली असती, याचा विचार करावा.

वाचा - दख्खनचा राजा श्री.जोतिबा मंदिर दर्शनासाठी बंद....  

आदर्श आचारसंहिता...

श्री. शेट्टी म्हणाले,‘‘पूर्वी बिल्ला लावणारा प्रत्येक जण संघटनेचा कार्यकर्ता होता. आता शिस्तीला महत्त्व देण्यात येणार आहे. पक्ष व संघटनेसाठी सक्रिय सभासदांची नोंदणी केली जाणार आहे. आदर्श आचारसंहिता तयार केली असून त्याची काटेकोरेपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. सक्रिय सभासदांना संघटनेच्या विचारधारेशी बांधील राहावे लागेल.’’
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from swabhiani shetkari sanghtna statewide environmental conference will be held