कोल्हापूर: आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला ठेवले बांधून

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 December 2020

हरभट यांना बांधून ठेवत प्रदुषण करणार्‍या घटकावर कडक कारवाईचा आग्रह धरला

कुरुंदवाड - पंचगंगा नदीच्या प्रदुषण प्रश्नी पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरभट यांना संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या कठड्याला दीड तास बांधून ठेवले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली तरीही कार्यकर्त्यांनी अधिकारी हरभट यांना बांधून ठेवत प्रदुषण करणार्‍या घटकावर कडक कारवाईचा आग्रह धरला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य आोळखून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी अधिकारी हरबड यांना सोडले. पंचगंगा नदीत रसायनयुक्त दुषित पाण्यामुळे तेरवाड बंधार्‍यावर मृत माशांचा खच पडला असून दुर्गंधी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून पंचगंगा काठावर दुर्गंधी पसरली आहे. प्रदुषणामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पंचगंगा नदीत तेरवाड बंधाऱ्यापर्यंत कोल्हापूर महानगरपालिका औद्योगिक वसाहत प्रोसेस व छोट्या-मोठ्या गावांचे सांडपाणी प्रक्रिये विना थेट पंचगंगा नदीत सोडत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. पाण्याला काळा रंग आला आहे. मासे मृत्युमुखी पडले आहेत. रासायनिक पाणी शेती उपयोगी नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे, बंडू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती.

आज दुपारी तीनच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी हरभट तेरवाड बंधार्‍यावर पाहणीसाठी आले होते. बंडू पाटील विश्वास बालिघाटे यांच्यासह आंदोलकांनी हरबट यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना बंधाऱ्याच्या कठड्याला दोरीने बांधून ठेवले. वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय सोडणार नाही या भूमिकेवर संघटनेचे कार्यकर्ते ठाम राहिले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिंगारे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी हरभट यांची सुटका करण्यात आली.
क्षेत्रीय अधिकारी हरभट यांनी पाण्याचे नमुने घेऊन तेरवाड बंधाऱ्यावरील मृत माशांचा पंचनामा केला. नमुने तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून अहवाल आल्यानंतर लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले. यावेळी राघू नाईक, योगेश जिवाजे, बंडू उमडाळे, बाहुबली चौगुले, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आशोक शिंगारे यांनी पंचगंगा प्रदूषणाला इचलकरंजी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून पालिकेने मृत्यूमुखी पडलेले मासे नदीतून उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी. तसेच टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर असणाऱ्या काळ्या नदीच्या ओढ्यावर तीन दिवसात तीन बांध घालून कलोरिन डोस सुरू करून प्रक्रिया करण्याची नोटीस इचलकरंजी पालिकेला लागू करून तत्काळ कारवाई न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दूरध्वनीवरून दिले असता आंदोलक शांत झाले.

हे पण वाचागावचं नाही..भावकीची चार मतं लई झाली ; बंडखोर, अपक्षांकडून अडवणूक सुरु

 

अन्यथा आंदोलन तीव्र करणार 
पंचगंगा नदीप्रदुषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना नाही. तसेच प्रशासनालाही नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासन करीत आहे. प्रदुषण करणार्‍या घटकांना पाठिशी घालण्याचे काम प्रशासन करत आहे. आतातरी कडक कारवाई करा अन्यथा आंदिलन तीव्र करु असा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीचे नेते बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांनी दिला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swabhimani shetkari sanghatana protest against panchganga river pollution