स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर दूध आंदोलन करणारच ; आंदोलन मोडीत काढण्याचा 'तो' डाव...

राजू पाटील
Monday, 20 July 2020

दूध दरावरती कुऱ्हाड चालवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे...

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) - शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली उद्यापासून सुरू होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी दूध आंदोलनामध्ये सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. शेतकऱ्यांच्या जीवनाचा हा प्रश्न असून कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस संघटना जबाबदार राहणार नाही असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जालंदर पाटील यांनी केले आहे.

स्वाभिमानीच्या या दूध आंदोलनाला आज पर्यंत गोकुळचा पाठिंबा असतानाच संघाने अचानक केलेले घुमजाव आणि दूध संकलनाचे दिलेले गावोगावी आदेश यामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन मोडीत काढण्याचा हा प्रकार पुढे येत आहे. मात्र संघटना कोणत्याही परिस्थितीत लॉक डाऊनचाही विचार न करता आंदोलन तीव्र करणार आहे व यातून नुकसान झाल्यास त्याला जबाबदार नाही. असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

राज्य आणि केंद्र शासनाकडून डोळेझाक
       
डॉ.पाटील म्हणाले, कोरोनाच्या अत्यंत बिकट काळामध्ये केवळ आणि केवळ शेतकरीच सर्वांना आधार देत आहे. यामध्ये जीवनावश्यक सर्व बाबीचा पुरवठा शेतकऱ्यांकडून होतोय याची जाण आणि भान सर्वांनाच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे राज्य आणि केंद्र शासनाकडून डोळेझाक केली जात आहे. आधीच साखर उद्योग मेटाकुटीला आला असतानाच आता दूध दरावरती कुऱ्हाड चालवून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूध व्यवसायावर शेतकऱ्यांचा आर्थिक कणा अवलंबून असताना दूध खरेदी दरात कपात करून हा व्यवसाय मोडीत काढण्याचा घाट पुढे येतो आहे. आधीच हा व्यवसाय परवडत नसताना केवळ अर्थार्जन म्हणून शेतकरी याकडे पाहतो आहे.

वाचा - राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंब्यामुळे दूध संघाला आली नोटीस...

अमृततुल्य समजल्या जाणाऱ्या दुधाला कवडीमोल किंमत देणे हे कोणत्या न्यायात बसते हे समजत नाही. सरकारने याचा गांभीर्याने विचार करु चांगला दर द्यावा म्हणून स्वाभिमानीने हे आंदोलन हाती घेतले आहे. आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ संघाने ही बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र संघाने अचानक घूमजाव करून उद्यापासून दूध संकलनाचा निर्णय घेतल्याचे पुढे आले आहे. याला हाणून पाडण्यासाठी आणि हक्काचा दर मिळण्यासाठी दूध उत्पादक सर्व शेतकऱ्यांनी दूध न घालता उत्स्फूर्तपणे आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

तुमचा पाठिंबा हेच संघटनेचे बळ

आज पर्यंत दूध संघ हे सरकारचे हस्तक म्हणूनच राहिले. त्यांचे हस्तक म्हणून दूध उत्पादकांनी ताटाखालचे मांजर व्हायचे काय ? याचा विचार करण्याची वेळ आली असून तुमचा पाठिंबा हेच संघटनेचे बळ आहे असेही डॉ.पाटील म्हणाले.

संपादन - मतीन शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana will carry out milk agitation