
दोन दशकापासून तोट्याच्या दृष्टचक्रात सापडलेल्या येथील बाजार समितीला सावरण्यासाठी नव्या प्रशासक मंडळाने काटकसरीची धोरण अंगीकारत उधळपट्टीला ब्रेक लावला आहे.
गडहिंग्लज : दोन दशकापासून तोट्याच्या दृष्टचक्रात सापडलेल्या येथील बाजार समितीला सावरण्यासाठी नव्या प्रशासक मंडळाने काटकसरीची धोरण अंगीकारत उधळपट्टीला ब्रेक लावला आहे. समितीच्या बैठकीला नाष्टा, जेवणाला फाटा देत पदरचा चहा पिण्याचा पायंडा सुरू केला आहे. गेल्या चौदा महिन्यापासुन प्रतीक्षेत असणाऱ्या समितीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन देऊन दिलासा दिला आहे. वसुलीसाठी मोहीम सुरू केली आहे. नव्या प्रशासकांच्या या जबाबदार भुमिकेचे स्वागत होत आहे.
सीमाभागातील सर्वात मोठी असणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा पदभार अभय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली अशासकिय 21 सदस्यांच्या जंबो प्रशासक मंडळाने स्विकारला. गडहिंग्लज, आजरा, चंडगड आणि कागल तालुक्यातील 37 गावांचे समितीचे कार्यक्षेत्र आहे. पीक पध्दतीच्या बदलामुळे सर्वच शेती उत्पादनांची आवक घटली आहे. परिणामी, अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी बाजार समिती तोट्यात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचा चौदा महिन्यापासून पगार नाही यावरूनच परिस्थिची भयानकता समजू शकते.
सध्याच्या प्रशासक मंडळात सहकार, शिक्षण, शेती, व्यापार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळेच नाजूक परिस्थिती पाहता या सर्वांनीच काटकसरीच्या कामाकाजासाठी प्रशासनाला सुनावले. महिन्याला सुमारे 10 ते 20 हजार रुपये चहा, नाष्ठ्यासाठी खर्च व्हायचे. काही माजी महाभाग संचालक आपल्या मित्रमंडळीसह येऊन समितीला आर्थिक भुर्दंडाच्या खाईत लोटत होते. नव्या प्रशासक मंडळाने या सर्वच प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
बाजार समितीचे कणा असणाऱ्या कर्मचांऱ्यांनाही महिन्याचे वेतन देत धीर दिला आहे. गाळ्यांची वसुलीसाठी मोहिम उघडली आहे. यापुर्वीच्या कारभाऱ्यांनी कवडीमोल दराने दिलेल्या भुखंडाची चौकशी करून ते पुर्वतत प्रशासक मंडळाने समितीकडे घ्यावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जुन्या आठवणींना उजाळा
बाजार समितीचे माजी सभापती (कै.) राजाराम देसाई, बळीराम देसाई (आजरा) हे बैठकीला आले की, स्थानिक पाहूणे मंडळीकडून जेवणाचा डबा मागवून घ्यायचे. भोजनाचा खर्च समितीवर पडू नये, असा त्यांचा कटाक्ष असायचा. अशा विश्वस्तांच्या भुमिकेमुळेच बाजार समिती सुवर्णमहोत्सवापर्यंत सुरळीत होती. नव्या प्रशासक मंडळाच्या काटकसरीच्या धोरणामुळे या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur