'या' शिक्षक बदली प्रक्रियेला हिरवा कंदील ; जुन, जुलै महिन्यात होणार बदली प्रक्रिया...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

कोरोनाच्या संकटामुळे बदली प्रक्रिया रखडणार असे चित्र दिसून येत होते. मात्र प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे बदली प्रक्रिया राबवावी यासाठी सातत्याने मागणी होत होती.

बेळगाव - शिक्षक बदली प्रक्रियेला कर्नाटक सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे जून व जुलै महिन्यात बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात शिक्षकांच्या बदलीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र अनेकदा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रकिया अनेक दिवस रखडली होती. तसेच शहरात 10 वर्षांपेक्षा अधिक दिवस सेवा बजावलेल्या शिक्षकांची सक्तीने बदली करण्यात आली होती. त्यामुळे सक्तीच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त झाली होती तसेच याबाबत काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. तरीही गेल्यावेळी बदली प्रक्रिया राबविण्यात शिक्षण खात्याला यश मिळाले होते.

त्या महिलेचा पती, भाऊ व चालक अडचणीत ; बेळगाव पोलिसात गुन्हा नोंदविणार...

यावेळी कोरोनाच्या संकटामुळे बदली प्रक्रिया रखडणार असे चित्र दिसून येत होते. मात्र प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे बदली प्रक्रिया राबवावी यासाठी सातत्याने मागणी होत होती. याची दखल घेत जुन महिन्याच्या अखेरीस बदली प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

बदली प्रकिया सुरळीतरित्या  व्हावी यासाठी शिक्षण खात्याने नवीन सॉफ्टवेअर तयार केले आहे तसेच बदली प्रक्रिया शिक्षक स्नेही असणार आहे. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे.शिक्षकांच्या बदलीसाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली असून बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
 

बदली प्रक्रिया घ्यावी यासाठी शिक्षण मंत्रांशी अनेकदा संवाद साधण्यात आला होता. आता बदली प्रकियेला अधिक विलंब न लावता शाळांना सुरुवात होण्यापूर्वी प्रक्रिया राबविली तर चांगले होईल
- जयकुमार हेबळी, अध्यक्ष बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The teacher transfer process has been approved by the Karnataka governent