चेकपोस्टवरील ड्युटीने वैतागले शिक्षक, कामातून मुक्त करण्याची केली मागणी 

अवधूत पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

22 मार्चपासून प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्टवर ड्युटी दिली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या काही शिक्षकांना गंभीर आजार आहे, तर काही शिक्षक वयस्क आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. शिवाय चेकपोस्टवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

गडहिंग्लज : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून गडहिंग्लज तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक विविध चेकपोस्टवर काम करीत आहेत. याबरोबरच शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षण, पालक संपर्कासह विविध कामे सुरू आहेत. दुहेरी कामे करताना शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्टवरील कामातून मुक्त करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने केली आहे. तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले आहे. 

22 मार्चपासून प्राथमिक शिक्षकांना चेकपोस्टवर ड्युटी दिली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या काही शिक्षकांना गंभीर आजार आहे, तर काही शिक्षक वयस्क आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. शिवाय चेकपोस्टवर कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

पाणी, शौचालय, पीपीई किट, सॅनिटायझरशिवाय शिक्षक आरोग्य धोक्‍यात घालून आणि मानसिक तणावाखाली काम करीत आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षण, पालक संपर्क, विद्यार्थ्यांना घरी जाऊन अभ्यास देणे, कार्यालयाकडून मागविली जाणारी विविध माहिती देणे या कामाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. या दुहेरी कामात शिक्षकांची कसरत होत आहे. त्यामुळे शिक्षकांना चेकपोस्टवरील कामातून मुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, समन्वय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वाईंगडे, सरचिटणीस गणपती पाथरवट, सतीश तेली, मधुकर येसणे, सुभाष निकम, संजय चाळक, आण्णासाहेब शिरगावे, राजेंद्र मांडेकर, भीमराव तराळ, अनिल बागडी, मधुकर जरळी यांनी हे निवेदन दिले. 

संपादन - सचिन चराटी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Demand Release From Work At Checkposts Kolhapur Marathi News