सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणखी एक महिना राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

यासह रायबाग तालुक्‍यातील चिंचलीचे मायाक्कादेवी मंदिरही बंद राहणार आहे. 

बेळगाव : कोरोना संसर्गामुळे सौंदत्ती यल्लम्मा (रेणुका) मंदिर आणखी एक महिना बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्‍वभूमीवर सौंदत्ती यल्लम्मा मंदिर 30 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह रायबाग तालुक्‍यातील चिंचलीचे मायाक्कादेवी मंदिरही बंद राहणार आहे. 

हेही वाचा - राजकारणातील उगवता ‘सूर्य’

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर उत्तर कर्नाटकातील सौंदत्तीतील रेणुकादेवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले आहे. राज्य शासनाने 8 जूनपासून राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली होती. रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने तसेच देवीचे भक्त हे तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा येथील असल्याने मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सहा महिन्यांपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. मात्र मंदिरात रोज धार्मिक कार्यक्रम होत आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तसेच सर्व राज्यांच्या सीमा खुल्या झाल्याने देवीच्या दर्शनासाठी मंदिरही खुले करण्याची शक्‍यता भाविकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र देवीचे दर्शन आणखी महिनाभर लांबणीवर टाकण्यात आले आहे. मंदिर खुले केल्यास भाविकांची दर्शनासाठी रीघ लागणार आहे. मागील सात महिन्यापासून भाविकांनी देवीचे दर्शन घेतलेले नाही. यंदा नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचे दर्शन मिळाले नाही. मंदिर नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -  अभयारण्यातील अनावश्‍यक रस्ते बंद करा

मात्र, डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. यात महाराष्ट्रातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर बंदचा घेतलेला निर्णय पाहता यंदा डिसेंबर महिन्यातील देवीचा उत्सवही मोजक्‍याच हक्कदारांच्या उपस्थितीत होणार असून इतरांना उत्सव काळात देवीचे दर्शन मिळण्याची शक्‍यता कमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सध्याच्या निर्णयानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. भाविकांची संख्या वाढल्यास कोरोना पसरण्याचा धोका असल्याने मंदिर आणखी महिनाभरासाठी बंद ठेवले जाणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the temple of saundatti not opened for 1 month collector of belgaum said in belgaum