कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे खुली 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

जिल्ह्यातील विविध दर्गा आणि मशिदीतही लगेचच गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे

कोल्हापूर - जिल्ह्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून दर्शनासाठी खुली झाली असून कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. तब्बल आठ महिन्यानंतर मंदिरे व प्रार्थनास्थळे खुली झाल्याने लगेचच येथे अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितीतील तीन हजार 42 मंदिरे खुली झाली असून या मंदिरात सध्या दिवसाला सहा तासच दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय इतर मंदिरातही अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे. 

उद्याच्या नमाजबाबत बैठक 
जिल्ह्यातील विविध दर्गा आणि मशिदीतही लगेचच गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझरबरोबरच प्रत्येकाची स्वतंत्र जानमाज (नमाज पठणासाठीची चटई) बंधनकारक करण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या नमाजबाबत उद्या (गुरूवारी) मुस्लीम बोर्डिंगमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे. 

हे पण वाचा - मुर्ती हलविण्यासाठी सुमारे शंभर मजूर आणि चार जेसीबी सलग ठरा तास राबत होते

चर्चही झाले खुले 
जिल्ह्यातील चर्चही आता खुले झाले असून सर्व चर्चच्या धर्मगुरूंची बैठक घेवून शासनाच्या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज चर्चमध्ये प्रार्थनासभा असतात. मात्र, रविवारी प्रार्थनेसाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे रविवारी तीन टप्प्यात प्रार्थना सभा घेतल्या जाणार आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temples open in Kolhapur district