नवीन 10 व्हेंटिलेटर आली, पण अजून वापर नाही... 

शिवाजी यादव 
बुधवार, 15 जुलै 2020

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढती आहे. अशात गंभीर रुग्णांवर उपचारासाठी नव्याने 10 व्हेंटिलेटर आली आहेत.

कोल्हापूर : कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढती आहे. अशात गंभीर रुग्णांवर उपचारासाठी नव्याने 10 व्हेंटिलेटर आली आहेत. त्याला आठवडा झाला तरी ती कार्यान्वित केलेली नाहीत. त्यामुळे आपद्‌कालीन स्थितीत धावपळ उडण्याची शक्‍यता आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार शासकीय रुग्णालयात कोरोनावर शाश्‍वत उपचार होत आहेत. त्यानुसार सीपीआर रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यानुसार उपचारपूरक साधनसामग्री दिली आहे तसेच कंत्राटी पदेही भरले आहेत. औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यासोबत स्वयंसेवी संस्था तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडून 10 व्हेंटिलेटर आली त्याचा वापर सुरू झाला. यात सीपीआरची 12 व्हेंटिलेटर होती. त्यांचा गरजेनुसार वापर होतो. यात आठ दिवसांपूर्वी नवीन दहा व्हेंटिलेटर आली आहेत. त्यामुळे एकूण जवळपास 32 व्हेंटिलेटर येथे कार्यरत आहेत. 

कोरोनाग्रस्तांसह हृदयशस्त्रक्रिया व अन्य आजारातील गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार होतात. त्यासाठी अतिदक्षता विभाग व हृदयशस्त्रक्रिया विभागातील सहा व्हेंटिलेटरचा वापर होतो. पंधरा दिवसांत रुग्ण संख्येत रोज भर पडत आहे. सध्या 420 कोरोनाग्रस्त उपचार घेत आहेत.

यातील गंभीर कोरोनाग्रस्तांना सीपीआरमध्येच आणले जाते. त्यामुळे रोज किमान दहा ते जास्ती जास्त 30 वर रूग्ण व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ येते. यातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे; मात्र बाधितांची संख्या वाढल्यास व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर घेण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. सीपीआरकडे नव्याने आलेले दहा व्हेंटिलेटर आलेत, त्याचा वापर अजूनही सुरू झालेला नाही. अशात अचानकपणे संख्या वाढली यातही काही गंभीर झाले तर गंभीर पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेता नव्याने आलेले व्हेंटिलेटर तातडीने बसविणे व त्याचा वापर करणे आवश्‍यक बनले आहे. 

मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलू...

दरम्यान, या सगळ्या प्रकाराबद्दल प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मीटिंगमध्ये असून नंतर बोलू असे उत्तर दिले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 10 new ventilators, but no use yet ...