कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल नाहीच

युवराज पाटील
Sunday, 18 October 2020

प्रभाग रचनेसह अन्य नऊ मुद्द्यांची माहिती महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाला दिली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सध्या अस्तित्वात असलेली प्रभाग रचना कायम राहणार आहे. महापालिका प्रशासनाने यासंबंधीची माहिती बुधवारी (ता. 14) राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. 

येत्या 20 नोव्हेंबरला महापालिका सभागृहाची मुदत संपणार आहे. जेमतेम महिन्याचा कालावधी नगरसेवकांच्या हाती राहिला आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्‍टोबरला मतदान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे महापालिका प्रशासन निवडणुकीची तयारी करू शकले नाही. त्यामुळे किमान तीन महिने निवडणूक पुढे जाणार आहे. मार्चमध्येच प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी होईल, अशी चिन्हे आहेत. 

2005, 2010 तसेच 2015 ला प्रभागांवर कोणते आरक्षण होते, प्रभागाची रचना कशी होती, तसेच आरक्षणाची स्थिती काय होती, याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. यासह अन्य नऊ मुद्द्यांची माहिती दिली गेली. 
2010 ला सर्व 81 प्रभागांच्या भौगोलिक रचनेत बदल करण्यात आला. अमुक एक गल्ली किंवा कॉलनीचा प्रभागात समावेश झाल्यास निकालाची गणिते बदलू शकतात, अशी अनेकांची मानसिकता आहे. 2021 च्या निवडणुकीत प्रभागांच्या रचनेत बदल होणार नाही. शहराची हद्दवाढ झाली असती तर हा बदल शक्‍य होता; मात्र हद्दवाढ झालेली नाही तसेच लोकसंख्येत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे 81 प्रभागांची सध्याचीच रचना कायम राहणार आहे. मागील तीन निवडणुकीतील आरक्षण, 2015 च्या निवडणुकीतील एस. सी. व एन. टी आरक्षणाची स्थिती आणि सध्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार होणारा बदल याची माहिती देण्यात आली. 

81 प्रभागात सध्या महिलांचे पन्नास टक्के आरक्षण आहे. रोटेशननुसार आरक्षणात बदल होणार आहे. ओबीसी प्रभाग आहेत ते खुले होतील व जे खुले आहेत त्यावर आरक्षण पडेल. खुल्या प्रवर्गातून जे विजयी झाले आहेत, त्यांनी ओबीसी किंवा कुणबी दाखला मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 

महापालिकेत सध्या कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडी फॉर्ममध्ये होती. या आघाडीला सत्तेसाठी काही मोजक्‍या कमी पडल्या. काळाच्या ओघात राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेना असे महाविकास आघाडीचे गणित आकारास आले. कोल्हापूर महापालिकेत 2015 पासूनच असे समीकण अस्तित्वात आहे. 
 
          दृष्टिक्षेपात 

  • सभागृहाची मुदत संपणार - ता. 20 नोव्हेंबर 
  • सध्याच्या प्रभागांची संख्या - 81 
  • महिलांसाठी पन्नास टक्के प्रभाग राखीव 
  • प्रभागाची मतदारसंख्या - सरासरी सहा हजार 

पक्षीय बलाबल 

  • कॉंग्रेस- राष्ट्रवादी - 44 
  • भाजप- ताराराणी - 33 (भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन) 
  • शिवसेना - 4 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no change in the ward structure for Kolhapur Municipal Corporation elections