गडहिंग्लजमधील उमेदवारांची अनामत रक्कम अधिकाऱ्यांकडेच

अवधूत पाटील
Thursday, 4 March 2021

सरपंच निवडीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा खाली बसला आहे. नवनिर्वाचित सदस्य गावचा कारभार हाताळायला सज्ज झाले आहेत.

गडहिंग्लज : सरपंच निवडीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा खाली बसला आहे. नवनिर्वाचित सदस्य गावचा कारभार हाताळायला सज्ज झाले आहेत. मात्र, निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल करताना त्यांनी जमा केलेल्या अनामत रकमेचे पुढे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अनामत रकमेचा एकत्रित आकडा सुमारे सहा लाख रुपयांपर्यंत जातो. सदरची रक्कम अद्याप संबंधित गावच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेच आहे. अनामत रक्कम मिळविण्यासाठी उमेदवारांना अर्ज सादर करावा लागेल. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल सहा महिने लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. गडहिंग्लज तालुक्‍यातील तब्बल 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तालुक्‍यातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत ही संख्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. गावचे कारभारी होण्याच्या इच्छेने दीड हजाराहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी सरासरी 25 ते 30 अर्ज दाखल झाले होते. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गात सुमारे एक हजार 100 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते; तर आरक्षित जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांची संख्या 550 च्या घरात आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या बरोबर अनामत रक्कम भरावी लागते. सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 500 रुपये, तर मागास, इतर मागास प्रवर्गासाठी 100 रुपये इतकी अनामत रक्कम आहे. अपेक्षित मते न मिळाल्याने जप्त झालेली अनामत वगळता एकूण रकमेचा आकडा सुमारे सहा लाख रुपयांपर्यंत जातो. सदरची रक्कम अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांकडेच आहे. मोठ्या गावांचा विचार केला तर एका-एका अधिकाऱ्यांकडील रक्कम 10 ते 15 हजारांपर्यंत आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे... 
- निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती............ 50 
- दाखल झालेले एकूण उमेदवारी अर्ज.... 1672 
- अर्ज दाखल केलेल्या व्यक्ती.................1559 

न घेतलेल्या अनामतीचा प्रश्‍न... 
प्रत्येक निवडणुकीनंतर सर्वच उमेदवारांकडून अनामत रक्कम घेतली जाते, असे नाही. अनेक उमेदवार अनामत घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जातही नाहीत. अशा परिस्थितीत शिल्लक राहिलेली रक्कम शासकीय तिजोरीत जमा होणे अपेक्षित असते. पण, असे होताना दिसत नाही. 

अर्ज सादर केल्यावर रक्कम
उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जमा केलेली अनामत रक्कम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहे. उमेदवारांनी आपापल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यावर त्यांना अनामत रक्कम मिळू शकेल. 
- दिनेश पारगे, तहसीलदार, गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Decision On The Deposit Of The Candidates In Gadhinglaj Kolhapur Marathi News