इचलकरंजीच्या रुग्णालयात फायर ऑडिटचा प्रश्‍न गंभीर

ऋषीकेश राऊत
Monday, 11 January 2021

दोन महिन्यांपूर्वीची सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअरला लागलेली आग आणि कालची भंडारा येथे आग लागून झालेला बालकांचा मृत्यू या दोन्ही घटना ताज्या आहेत, तरीही आयजीएम रुग्णालयात फायर ऑडिटचा प्रश्‍न गंभीर आहे.

इचलकरंजी : दोन महिन्यांपूर्वीची सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअरला लागलेली आग आणि कालची भंडारा येथे आग लागून झालेला बालकांचा मृत्यू या दोन्ही घटना ताज्या आहेत, तरीही आयजीएम रुग्णालयात फायर ऑडिटचा प्रश्‍न गंभीर आहे. एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ऑडिटमधील 90 टक्के सुधारणा झाल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे आयजीएममध्ये फायर ऑडिटमधील उपाययोजनांची 10 टक्केही सुधारणा न झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आयजीएम रुग्णालयातील ही धोक्‍याची घंटा रुग्णांच्या जीवाशी खेळणारी आहे. 

सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने जलदगतीने आयजीएमचे फायर ऑडिट केले. फायर ऑडिट होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी उपाययोजनांच्या सुधरणांचा श्रीगणेशाही झाला नव्हता. सध्या या कामाची सुरवात धीम्या गतीने आहे. भंडाराच्या घटनेनंतर फायर ऑडिटचा प्रश्‍न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

अशा घटनेच्या गांभीर्यापासून आयजीएम रुग्णालय मात्र दूर असल्याचे दोनदा स्पष्ट झाले आहे. सध्या रुग्णालयातील विद्युत सुरक्षा बेभरवशाची आहे. लोंबकळणाऱ्या तारा, नादुरुस्त विद्युत जोडण्या यामुळे फायर ऑडिट उपाययोजनांचा प्रश्‍न अतिगंभीर बनला आहे. आयजीएममध्ये एखादी आग लागल्यानंतरच परिपूर्ण सुधारणा होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

प्रसूती विभाग, मेल व फिमेल वॉर्ड यासह अनेक ठिकाणी रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचा अभाव आहे. दोन तालुक्‍यातील सर्वसामान्यांचा आधार असलेल्या आयजीएम रुग्णालयातील सुरक्षेला अधिक महत्त्व आहे. जुनाट विद्युत जोडण्यांचे लेखापरीक्षण करूनही उपाययोजना ताटकळत आहेत. त्यामुळे फायर ऑडिटनुसार 100 टक्के सुधारणा आयजीएममध्ये होणे गरजेचे होते. सुधारणांना गती देऊन कामे झाली तरच आगीच्या घटनांना आवर घालता येईल. 

केवळ दोन अग्निशमन यंत्र 
आयजीएमचा आवाका पाहता या ठिकाणी अग्निशमन यंत्राची मोठी कमतरता आहे. केवळ आयसीयू विभाग व बाह्यरुग्ण कक्षात अशी दोन अग्निशमन यंत्र ट्रामा केअर आगीच्या घटनेनंतर ठेवली आहेत. इतर वॉर्डात तर अभावच आहे. त्यामुळे आयजीएममधील अग्निशमन यंत्रणा तोकडी आहे. 

उपाययोजना करण्याचे काम
आयजीएम इमारत फार जुनी असल्याने फायर ऑडिटनुसार सुधारणा अधिक आहेत. सध्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. 
- डॉ. आर. आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक आयजीएम 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Implementation Of Fire Audit In Ichalkaranji Hospital Kolhapur Marathi News