डोळ्यांदेखत झाली स्वप्नांची राखरांगोळी

प्रकाश कोकितकर
Wednesday, 16 September 2020

येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वामी चौकातील किराणा आणि घरगुती वस्तूंच्या विक्री दुकानाला आज पहाटे आग लागली. आगीत संपूर्ण माल जळून खाक झाला. यामध्ये बाजीराव मारुती तेलवेकर यांचे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान झाले.

सेनापती कापशी : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वामी चौकातील किराणा आणि घरगुती वस्तूंच्या विक्री दुकानाला आज पहाटे आग लागली. आगीत संपूर्ण माल जळून खाक झाला. यामध्ये बाजीराव मारुती तेलवेकर यांचे सुमारे पंधरा लाखाचे नुकसान झाले. मंडलिक साखर कारखाना आणि घोरपडे साखर कारखाना यांच्या अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. दुकानातून आगीच्या प्रचंड ज्वाला बाहेर येत होत्या. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अंदाज व्यक्त केला. 
येथील गावच्या मध्यवर्ती असलेल्या स्वामी चौकात नव्याने झालेल्या इमारतीत फेब्रुवारीत कापशी बझार या नावाने दुकान सुरू झाले होते. येथे किराणासह घरगुती वापरातील वस्तू मिळत होत्या. दोन मजल्यावर हा बझार होता. जनता कर्फ्यूमुळे गेले आठ दिवस दुकान बंद होते. आज पहाटे पाचच्या सुमारास इमारतीसमोर राहणारे बाळू शिंदे फिरायला जाण्यास बाहेर पडले असता दुकानातून आग नजरेस पडली. त्यांनी त्वरित दुकानाचे मालक बाजीराव तेलवेकर यांना मोबाईलवरून कळवले. त्यानंतर शटर उघडले तेव्हा आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. दुकानातील खाद्यतेलाच्या साठ्याने आगीचा भडका वाढत होता. नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. 
जळालेले साहित्य बाहेर काढण्यासाठी उपसरपंच तुकाराम भारमल, अक्षय नाईक, अजय जाधव, ओंकार शिंदे, दयानंद तेलवेकर, अमोल डवरी, प्रकाश निर्मळे बाळू शिंदे, शिवाजी शिंदे, सचिन येजरे, आदी तरुणांनी मदत केली. सकाळी साडेदहाच्या सुमारास बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी दत्तात्रय वालावलकर, तुकाराम भारमल उपस्थित होते. घटनेची नोंद मुरगूड पोलिस दिली. 

तेलसाठ्यामुळे भडका 
सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना आणि काळम्मा बेलेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण केले; पण दुकानात असलेल्या तेलाच्या साठ्यामुळे आग भडकून जवळपास सर्व साहित्य खाक झाले होते. भिंतींचा गिलावाही ढासळला आहे. अखेर तब्बल दोन तासानंतर आग आटोक्‍यात आली. त्यामुळे लागूनच हॉटेल, राहती घरे असूनही अनर्थ टळला. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was a flurry of dreams before my eyes