
गजबजलेल्या रस्त्यावर भर दिवसा चोऱ्या; सीसीटीव्हीवर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर : रात्रीची नव्हे तर भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर पार्किंग केलेल्या मोटारसायकल चोरण्याचा चोरट्यांनी शहर आणि परिसरात धडाकाच लावला. शहरात सीसी टीव्हीचे जाळे असूनही चोरटे वचरढ ठरत आहेत.
शहर परिसरात काही वर्षापासून मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. ‘साहेब रस्त्याकडेला मोटारसायकल उभी केली होती. दहा मिनिटे कामासाठी गेलो होते. तेवढ्यात चोरट्याने गाडी चोरून नेली.’ अशी दिवसांतून एक तरी तक्रार पोलिस ठाण्यात येते. गेल्या दोन चार महिन्यांत मोटारसायकलसह चेन स्नॅचिंग, पोलिस असल्याची बतावणी करून किमंती ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढू लागले. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी शहर परिसरात रात्री नाकाबंदी केली जाते. नाकाबंदीतून मोटारीची नंबर प्लेट मोटारसायकलला लावून फिरणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जुना राजवाडा पोलिसांनी मोटारसायकल जप्त केली.
शहर परिसरात रात्री गस्त नाकाबंदीच्या रूपाने पोलिसांचे अस्तित्व दिसू लागले. काही दिवसापूर्वी मनीषानगर परिसरात अंत्यविधीसाठी गेलेल्या तरुणाची मोटारसायकल चोरून नेली. रंकाळा चौपाटी परिसरातून दुपारी चोरट्याने दोन मोटारसायकल तर मंगळवार पेठ, खासबाग येथून सायंकाळी मोटारसायकल चोरून नेली. महाद्वाररोड येथील कसबा गेट पोलिस चौकीजवळूनही सकाळच्या वेळी अर्धातासाच मोटारसायकल चोरून नेल्याचे दाखल झाले. तर मध्यवर्ती बस स्थानक ते रेल्वे फाटक रस्त्यावर पार्किंग केलेली मोटारसायकल दोघा चोरट्यांनी चोरून नेली.
नागरिकांच्या अपेक्षा...
तक्रारीची दखल तातडीने घ्या.
शहरातील सीसीटीव्हीतील उणिवा दूर करून संख्या वाढवा
रात्रीसह दिवसाचीही गस्त, नाकाबंदी करा
रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवा.
संपादन- अर्चना बनगे