
संभाजी चौक परिसरातील किरण गॅसजवळ वर्दळीच्या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
इचलकरंजी (कोल्हापूर) : सीआयडी पोलिस असल्याचे भासवून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाच्या अंगावरील तब्बल १४ तोळे सोन्याचे दागिने लुबाडले. संभाजी चौक परिसरातील किरण गॅसजवळ वर्दळीच्या ठिकाणी दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याबाबतची तक्रार राजाराम रामेश्वरलाल महेश्वरी (वय ६८, रा. लक्ष्मी प्रोसेस परिसर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली. या घटनेतील दोन्ही संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - प्रियकराने प्रेमच असे केले की, शेवटी नशीबी त्याच्या कोयत्याचे वार आले -
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : महेश्वरी आपल्या मोपेडवरून जुना चंदूर रोडवरील लक्ष्मी व्यंकटेशनगरमध्ये राहणाऱ्या बहिणीकडे जात होते. त्या वेळी त्यांचा दोन्ही संशयितांनी दुचाकीवरून पाठलाग केला. संभाजी चौक ते उत्तम-प्रकाश चित्रपटगृह मार्गावरील किरण गॅस एजन्सीजवळ महेश्वरी आले. त्या वेळी एका संशयिताने त्यांना थांबविले. त्याने सीआयडी पोलिस असल्याचे भासवले. तो म्हणाला, की चाकूहल्ला झाला असून, गावात वातावरण तंग आहे.
अंगावरील दागिने गाडीच्या डिकीमध्ये ठेवा. याचवेळी संशयिताचा दुसरा साथीदार तेथे आला. त्यानेही सीआयडी असल्याची बतावणी करीत अंगठी बॅगेत ठेवत असल्याचे भासविले. त्यामुळे महेश्वरी यांनी घाबरून आपले दागिने एका पिशवीत घालून आपल्या मोपेडच्या डिकीत ठेवले. पण, दोघांपैकी एकाने डिकीतील दागिने घेऊन ते मोजत असल्याचे भासविले. याचवेळी संशयितांनी हातचलाखी करीत दागिने लंपास केले. त्यानंतर दोन्ही संशयित तेथून दुचाकीवरून पसार झाले. आवाडेनगर येथे आल्यानंतर महेश्वरी यांनी डिकीत दागिने पाहिले असता ते नसल्याचे निदर्शनास आले. आपली लुबाडणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुजेटची पाहणी केली. त्यात दोन्ही संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद आहेत.
हेही वाचा - लय भारी! कोल्हापुरकराचा हातगाडी ते मर्सडीज बेंझ असा प्रेरणादायी प्रवास
लुबाडलेले दागिने असे
१) चेन (वजन पाच तोळे, किंमत दोन लाख)
२) ब्रेसलेट (वजन आठ तोळे, किंमत तीन लाख २० हजार)
३) अंगठी (वजन एक तोळा, किंमत ४० हजार)
लुबाडलेले दागिने
संपादन - स्नेहल कदम