आजऱ्यात ऊस उचलणीसाठी विनवण्या

रणजित कालेकर
Monday, 7 December 2020

गतवर्षीप्रमाणे यंदा देखील आजरेकरांना ऊस घालण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. आजरा कारखाना याही गळीत हंगामात सुरू न झाल्याने त्यांना ऊस घालवण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे.

आजरा : गतवर्षीप्रमाणे यंदा देखील आजरेकरांना ऊस घालण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. आजरा कारखाना याही गळीत हंगामात सुरू न झाल्याने त्यांना ऊस घालवण्यासाठी विनवण्या करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच कारखान्यांकडे तोडणी यंत्रणा कमी आहे. आजऱ्यात मोठ्या प्रमाणात टोळ्या उतरलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी इतर कारखान्यांच्याकडे धावपळ करावी लागत आहे. आजऱ्याच्या कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहेच, पण ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

जिल्हा बॅंकेने थकीत कर्जापोटी आजरा कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी बॅंकेतर्फे दोन वेळा निविदा काढल्या, पण कारखाना चालवण्यास सक्षम पार्टी पुढे ने आल्याने यंदाही कारखाना सुरू झाला नाही. कारखाना बंद राहिल्याने तालुक्‍यात उत्पादित होणाऱ्या उसाची उचल वेळत होणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना बीड, उस्मानाबाद, मराठवाड्यातील ऊस तोडणी यंत्रणेवर अवलंबून रहावे लागते.

यंदा कोरोनामुळे 30 टक्के यंत्रणा कमी आल्याने कारखान्यासमोर तोडणी यंत्रणेची अडचण आहे. या पार्श्‍वभूमीवर आजरा तालुक्‍यात आजघडीला केवळ तीन कारखान्यांच्या टोळ्या उतरल्या आहेत. यामध्ये अथनी शुगर्स तांबाळे या एकाच कारखान्याच्या 65 टोळ्या असून ही दिलासा देणारी बाब आहे. त्यांनी 21 हजार टन उसाची उचल केली आहे. अन्य दोन कारखान्यांच्या वीस पंचवीस टोळ्या आहेत. 

तालुक्‍यात 4 हजार 700 हेक्‍टरवर ऊस पीक आहे. त्यामुळे सुमारे साडेतीन लाख उसाची उपलब्धता होणार आहे. यंदा ऊस पिकासाठी पाऊस व हवामान चांगले राहिल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार आहे, पण तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. तोडणीसाठी खुशालीच्या नावाखाली चिरीमिरीचे प्रकार सुरू झाले आहेत. एक लोडला दीड हजार रुपये इतका दर गेल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक ससेहोलपट ठरलेलीच आहे. त्यामुळे एकीकडे उसाला टोळी नाही तर, दुसरीकडे ऊस घालवण्यासाठी जादा दराने खुशालीचे पैसे मोजावे लागल्याने तो आर्थिक दृष्ट्या भरडला जाणार आहे. 

40 हजार टनाची उचल 
आजरा तालुक्‍यात यंदा अथनी शुगर्स तांबाळे, सरसेनापती घोरपडे, अथर्व शुगर्स चंदगड या तीन कारखान्यांच्या सुमारे 90 टोळ्या ऊस तोडणीसाठी कार्यरत असून तालुक्‍यात आतापर्यंत सुमारे 40 हजार टन उसाची उचल झाल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time To Requests Factories For Sugarcane Kolhapur Marathi News