
गेल्या आठवड्यापासून नववी ते बारावीच्या नियमित वर्गांना सुरवात झाली आहे. कोरोनामुळे शासनाच्या धोरणानुसार गेले चार महिने "शाळा बंद... शिक्षण सुरू' होते. विद्यार्थ्याना यू ट्यूब, व्हिडिओ, व्हॉटस ऍपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला गेला. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचे आकलन झालेले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शिक्षकांना पुन्हा अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली आहे.
गडहिंग्लज : गेल्या आठवड्यापासून नववी ते बारावीच्या नियमित वर्गांना सुरवात झाली आहे. कोरोनामुळे शासनाच्या धोरणानुसार गेले चार महिने "शाळा बंद... शिक्षण सुरू' होते. विद्यार्थ्याना यू ट्यूब, व्हिडिओ, व्हॉटस ऍपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला गेला. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाचे आकलन झालेले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शिक्षकांना पुन्हा अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करण्याची वेळ आली आहे.
वार्षिक परीक्षा होण्याअगोदरच कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी शैक्षणिक वर्ष नाईलाजाने गुंडाळावे लागले. लॉकडाउनचा कालावधी वाढत गेल्यामुळे परीक्षाही रद्द करण्यात आल्या. वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेऊन निकाल लावला. जूननंतरही कोरोनाची स्थिती बदलली नसल्याने शाळा सुरू झाल्या नाहीत. जुलैनंतर तर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शाळा सुरू होण्याचा मुहूर्त लांबत गेला. त्यामुळे शासनाने "शाळा बंद...शिक्षण सुरू' ही ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना राबवली.
मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे व्हॉटस ऍप गट करण्यात आले. त्या गटात अभ्यासक्रमातील धडे, गृहपाठ दिला. काही शिक्षकांनी, तर त्या धड्यांचे व्हिडिओ करून शिकविण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला कुतूहल म्हणून विद्यार्थ्यांचा याला प्रतिसाद मिळाला. पंरतु, शाळा सुरू होण्याचा कालावधी लांबू लागला तसा विद्यार्थ्यांचा यातील रस कमी झाला. केवळ औपचारिकता म्हणूनच याकडे पाहिले गेल्याने हे ऑनलाईन शिक्षण कधी ऑफलाईन झाले हे कोणालाच कळाले नाही.
आता गेल्या आठवड्यापासून एक दिवसाआड 50 टक्के उपस्थितीत योग्य ती खबरदारी घेत शाळा, कनिष्ठ महविद्यालये सुरू झाली. शिक्षकांना नियमित वर्गावर गेल्यावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविलेल्या अभ्यामक्रमाचे आकलन झालेले नसल्याचे आढळत आहे. केवळ मोजक्या विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला आहे. गृहपाठ अपुरा असल्याने अनेकांनी शाळेला दांडी मारल्याने उपस्थिती जेमतेम आहे. विशेषत: दहावीचे विद्यार्थी आकलनात पिछाडीवर असल्याने पुन्हा अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करावा लागतो आहे.
पालकांची सुटका
गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. परिणामी, विद्यार्थी शैक्षणिक वातावरणापासून आठ महिने दुरावले होते. शाळेसह खासगी क्लासेस देखील बंद होते. परिणामी, वारंवार सांगूनही पाल्यांची अभ्यासाची मानसिकता नसल्याने पालकही वैतागले होते. त्यामुळे घराघरांत या नव्या प्रश्नामुळे चिंतेचे चित्र होते. एक दिवस आड का असेना विद्यार्थी शाळेला जाऊ लागल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
शाळा सुरू झाल्या आहेत. वर्गात शिकविताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पूर्ण केलेला अभ्यासक्रम समजलेला दिसत नाही. त्यामुळे शिक्षकांना पुन्हा शिकवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागत आहे.
- जी. एस. शिंद, साधना हायस्कूल, गडहिंग्लज
संपादन - सचिन चराटी
Kolhapur