'सह्याद्रीचा रणसंग्राम नसानसांत रोमांच उभे करेल' : खासदार संभाजीराजे

संभाजी गंडमाळे
Tuesday, 10 November 2020

'सह्याद्रीचा रणसंग्राम' ही गीतमाला तमाम महाराष्ट्राच्या नसांनसांत रोमांच उभे करेल, असे गौरवोद्‌गार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले.

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई यांच्याबरोबरच रणरागिणी ताराराणींच्या शौर्याचाही येत्या काळात विविध माध्यमातून जागर व्हायला हवा. 'सह्याद्रीचा रणसंग्राम' ही गीतमाला तमाम महाराष्ट्राच्या नसांनसांत रोमांच उभे करेल, असे गौरवोद्‌गार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले.

सह्याद्री प्रतिष्ठान (महाराष्ट्र) या संस्थेच्या माध्यमातून आज या गीतमालेच्या ध्वनीमुद्रण प्रारंभावेळी ते बोलत होते. येथील राधाई रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम झाला. दरम्यान, बारा गीतांच्या या गीतमालेतून मराठ्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर येणार असून त्याला तरूणाईचाही मोठा प्रतिसाद मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा - आता घड्याळाची टिकटिक होणार वेगाने -

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून गडकिल्ले संवर्धनासाठी अतिशय चांगले काम सुरू आहे. येत्या काळात रायगडबरोबरच आणखी चाळीस किल्ल्यांच्या संवर्धनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी या संस्थेवर प्रमुख जबाबदारी देण्याचा विचार आहे.' यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या, 'महाराष्ट्राची देदीप्यमान परंपरा, संस्कृती जतन आणि संवर्धनासाठी आणखी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. त्याचाच ही गीतमाला एक भाग आहे.' 

आमदार संजय केळकर यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागातून सुरू असलेल्या किल्ले जतन व संवर्धनाची माहिती दिली. गीतकार व शाहीर युवराज पाटील, संगीतकार शशांक पोवार यांनी शिवचरित्र व शंभूचरित्र गीतरूपाने नव्या पिढीत रूजावे, या उद्देशाने ही गीतमाला होत असल्याचे सांगितले. यावेळी दीपक प्रभावळकर, गणेश लोणारे यांच्यासह गड-किल्ले संवर्धनातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक चंद्रशेखर धन्वंतरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

हेही वाचा - दोन्ही काँग्रेसला सत्ताबदलाचे वेध ; भाजपमधून कोण करणार बंडखोरी ? -

भूमिकेने दिला आत्मविश्‍वास 

महाराणी येसूबाई यांची भुमिका साकारताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घोड्याला हात लावायलाही भिती वाटायची. पण, आज हाच घोडा भरधाव वेगाने पळवू शकतो. एक वेगळाच आत्मविश्‍वास 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने दिला, असे यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आवर्जुन सांगितले.  

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today song series of sahyadri pratishthan launch event said sambhajiraje chhatrapati in kolhapur