सहकाराच्या चाकांना "खासगी' चालक

अजित माद्याळे
Monday, 19 October 2020

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍याच्या सहकार क्षेत्रात मोठ्या थाटामाटाने डोलणारे तीन साखर कारखाने. ही तिन्ही कारखाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र. दोन कारखान्यांचे गाळप खासगी व्यवस्थापनाने सुरू केले.

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍याच्या सहकार क्षेत्रात मोठ्या थाटामाटाने डोलणारे तीन साखर कारखाने. ही तिन्ही कारखाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र. दोन कारखान्यांचे गाळप खासगी व्यवस्थापनाने सुरू केले आहे, तर तिसरा आजऱ्याचा कारखाना त्याच वाटेवरून मार्गक्रमण करत आहे. ज्या-त्या कारखान्यांच्या संस्थापकांनी मोठ्या कष्टातून सहकारी तत्त्वावर उभारलेल्या साखर कारखान्यांच्या चाकांना खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चालक देण्याचा प्रयत्न झाला आहे. 

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुके तसे डोंगराळ. परंतु, गेल्या दोन-तीन दशकातील पाणी प्रकल्पामुळे हजारो हेक्‍टर शेती बागायती झाल्या. त्यामुळे प्रमुख पीक म्हणून शेतकऱ्यांनी उसाला पसंती दिली. उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी गडहिंग्लज साखर कारखाना, चंदगडमध्ये दौलत आणि गवसे येथे आजरा साखर कारखाना जन्माला आले. 

दरम्यान, काही वर्षांनंतर कारखाने आर्थिक अरिष्टात अडकू लागल्याने शेतकऱ्यांची उन्नती तर लांबच, कारखाना सुरू करणेही मुश्‍कील झाले. त्याची कारणे सभासदांसह नागरिकही जाणून आहेत. खासगी व्यवस्थापनाकडे या विभागातील साखर कारखाना चालवण्यास देण्याची सुरवात आजऱ्यातून झाली. सात हंगाम खासगी व्यवस्थापनाकडून घेतले. त्यानंतर संचालक मंडळाने आत्मविश्‍वासाने कारखाना सहकारातून स्वबळावर सुरू केला. उत्तम चाललेला कारखाना अचानक पुन्हा गतवर्षीपासून अडचणीत आला. यामुळे पुन्हा खासगी "चालक' शोधण्याची वेळ संचालक मंडळावर आली आहे. या प्रयत्नात गतवर्षीचे गाळपच झाले नाही. यंदाच्या प्रयत्नांनाही अजून यश आलेले नाही. 

चंदगडच्या उत्पादकांची अस्मिता असलेल्या दौलत कारखान्याची चाके बंद पडल्यानंतर तेथील शेतकरी आणि कामगार अक्षरश: रडकुंडीला आले. चार ते पाच वर्षे या कारखान्याची चिमणी बंद राहिली. त्यानंतर दोन हंगाम खासगी कंपनीने घेतले आणि पुन्हा कारखाना बंद पडला. गतवर्षीपासून अथर्व शुगर्सकडे हा कारखाना आहे. गडहिंग्लजचा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात गेल्याची कुणकुण लागताच कारखान्याची चाके बंद पडू नयेत म्हणून संचालक मंडळाने खासगी कंपनीकडे कारखान्याची सूत्रे दिली.

सहकारातील ही तिन्ही कारखाने वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक अडचणीत आली. कारखान्याची चाके बंद पडल्यानंतरची झळ चंदगडमधील शेतकऱ्यांना चांगलीच बसली आहे. आता त्या पाठोपाठ आजऱ्यातील शेतकरी व कामगारांची अवस्था आहे. तिन्ही तालुक्‍यांचे हे सहकाराचे वैभव पुन्हा अवतरेल का, याचे उत्तर मात्र सध्या तरी देणे अशक्‍य आहे. 

गाळपाची सोय, पण..? 
सहकारातील कारखाने खासगी कंपनीकडे देण्याची सोयच नसती तर उसाचे करायचे काय? हा प्रश्‍न भेडसावला असता खासगीच्या पर्यायामुळे उसाचे गाळप तरी सुरू झाले. शेतकऱ्यांचे इतर कारखान्याकडील हेलपाटे वाचले. त्यांचे अर्थचक्र सुरू होण्यास मदत झाली. कामगारांच्या घरी चूल पेटू लागली. बाजारपेठा गजबजू लागल्या. परंतु, सहकार आणि शेतकरी या घट्ट नात्याला तडा गेल्याची भावना आजही शेतकऱ्यांत आहेत. सहकाराच्या सोयी-सुविधांमध्ये अडचणी आल्या. सवलतीच्या साखरेचे दर वार्षिक सभेऐवजी चालक ठरवू लागले. सभासद आणि त्यांच्या हक्काच्या वार्षिक सभा केवळ चर्चेसाठी राहिल्या. कामगारांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित राहिले. म्हणूनच सहकाराशी जुळलेल्या भावना परत अनुभवता येतील का, या प्रतीक्षेत शेतकरी, कामगार आहेत. 

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Towards privatization of co-operative factories in Gadhinglaj subdivision