जयसिंगपुरातील वाहतूक प्रश्‍न सोडवणार आता "ट्राफीक ब्रॅंच'

गणेश शिंदे 
सोमवार, 29 जून 2020

शहरात स्वतंत्र ट्रॅफिक ब्रॅंच प्रस्ताव मंजूर करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 

जयसिंगपूर : शहरात स्वतंत्र ट्रॅफिक ब्रॅंच म्हणजेच वाहतूक शाखेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून जिल्हा पोलिस प्रशासन याप्रश्‍नी सकारात्मक आहे. लोकवर्गणीतून "सेफ सिटी'तर्गत सीसीटीव्ही प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर जिव्हाळ्याचा वाहतूक प्रश्‍न स्वतंत्र ट्राफिक ब्रॅंचमुळे निकालात निघणार आहे. हा प्रस्ताव मंजूर करुन यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित झाल्यास शिक्षण नगरीतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील या शहरात शिक्षणाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थ्यांची शहरात वर्दळ असते. शिवाय वैद्यकीय क्षेत्रात अलिकडे झालेल्या चांगल्या बदलांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांचाही ओढा शहराकडे असतो. शहरातील हॉस्पिटलबाहेर वाहनांची गर्दी लक्षात घेता ही बाब प्रकर्षाने जाणवते. आठ-दहा वर्षात शहरातील वाहतुकीचा हा प्रश्‍न बिकट बनला आहे. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी शहरातील वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी स्वतंत्र ट्राफिक ब्रॅंचचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाला दिला होता. 

इचलकरंजीच्या धर्तीवर जयसिंगपूरमध्येही अशी यंत्रणा हवी ही बाब पटवून दिली. आर्किटेक्‍ट अँड इंजिनिअर्स असोसिएशननेही वाहतूक कोंडीचा अभ्यास करुन शहरात सम-विषम पार्किंगचा पर्याय पुढे आणला होता. नगरपालिकेनेही याला प्रतिसाद देत याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. मात्र, याप्रश्‍नी दिरंगाई झाली. सध्या शहरातील वाहतुकीची कोंडी हाच जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून शहरात स्वतंत्र ट्रॅफिक ब्रॅंचच्या प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबत विचार सुरु झाला आहे. त्यामुळे लवकरच शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित होईल, अशी आशा नागरीकांना लागून राहिली आहे. 
 

जुन्या इमारतीचा वापर 
जयसिंगपूर पोलिस ठाण्याची जुनी इमारत ट्रॅफिक ब्रॅंचसाठी वापरात येऊ शकते. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी जुन्या इमारतीचे लोकवर्गणीतून रुपडे पालटले आहे. ती आता ट्रॅफिक ब्रॅंचसाठी वापरात येऊ शकेल. 

जयसिंगपूर शहरात स्वतंत्र ट्रॅफिक ब्रॅंचची गरज आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर असणाऱ्या या शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी शहरात लवकरच स्वतंत्र ट्रॅफिक ब्रॅंचसाठी आग्रही आहे. शहरातील वाहतुकीच्या प्रश्‍नावर मी गंभीर आहे. 

- डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा पोलिस प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Branch in Jaysingpur on the way