गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी, तहसीलदारांची बदली

अजित माद्याळे
Saturday, 3 October 2020

गडहिंग्लज-चंदगडच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि येथील तहसीलदार दिनेश पारगे यांच्या आज अचानक झालेल्या बदलीने स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांसह नागरिकही आश्‍चर्यात पडल्याचे चित्र आहे.

गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगडच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर आणि येथील तहसीलदार दिनेश पारगे यांच्या आज अचानक झालेल्या बदलीने स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांसह नागरिकही आश्‍चर्यात पडल्याचे चित्र आहे. सांगलीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बाबासाहेब वाघमोडे यांची प्रांताधिकारीपदी, तर रामलिंग चव्हाण यांची तहसीलदारपदी नेमणूक झाली. दरम्यान, गडहिंग्लजचे नवे पोलिस उपअधीक्षक म्हणून गणेश इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे तालुक्‍यात आता तीन महत्त्वाचे अधिकारी नव्याने रुजू होत आहेत. 

पांगारकर यांनी दोन वर्षांपूर्वी येथील प्रांताधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली होती. तहसीलदार पारगे यांचा वर्षभराचा कालावधी पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षीचा महापूर आणि सध्याच्या कोरोना कालावधीत या दोन्ही अधिकाऱ्यांनी चांगले काम केले. प्रशासकीय कामकाजाबरोबरच लोकसंपर्कात राहून जनतेच्या समस्या सोडविण्याला त्यांनी प्राधान्य दिले.

मुदतीपूर्वीच या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने स्थानिक महसूल कर्मचारी व नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. गडहिंग्लज-चंदगडचे प्रांताधिकारी म्हणून वाघमोडे यांची नियुक्ती झाली आहे. वाघमोडे हे सांगली भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत होते. तहसीलदारपदी नेमणूक झालेले चव्हाण यांनी यापूर्वी येथे काम केले. वर्षभरापूर्वी त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या येथील जागेवरच पारगे यांची नेमणूक झाली होती. चव्हाण हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदारपदी (सर्वसाधारण) कार्यरत होते. 

इंगळे रत्नागिरीतून गडहिंग्लजला 
दरम्यान, गडहिंग्लजचे पोलिस उपअधीक्षक अंगद जाधवर यांच्या सुरू असलेल्या चौकशीमुळे त्यांची बदली झाली होती. त्यामुळे येथील पदाचा प्रभारी कार्यभार प्रशांत अमृतकर यांच्याकडे होता. आता रत्नागिरीत कार्यरत असलेले पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांची येथे बदली झाली आहे. इंगळे यांनी यापूर्वी नक्षली भागातील गडचिरोली येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले. तेथे नक्षलवादीविरोधी मोहीम उघडून त्यांनी पाच नक्षलवाद्यांना अटक केली, तर तिघांचे आत्मसमर्पण घडवून आणले होते. त्याबद्दल त्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्हही मिळाले आहे. 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer Of Gadhinglaj Prantadhikari, Tehsildar Kolhapur Marathi News