उपचारासाठी 60 कि.मी.पर्यंत प्रवास

Travel Up To 60 Km For Treatment Kolhapur Marathi News
Travel Up To 60 Km For Treatment Kolhapur Marathi News

कोल्हापूर : गरजू घटकांना मोफत उपचार सेवेचा लाभ देणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरते आहे. डोंगरी, जंगली, दुष्काळी तालुक्‍यात खासगी रुग्णालये, स्पेशालिस्ट डॉक्‍टर कमी आहेत. परिणामी धनगरवाड्यांपासून ते गावातील गंभीर आजारी रुग्णांना 30 ते 60 किलोमीटर अंतर दूर येऊन या योजनेत उपचार घेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, सध्या लॉकडाउनमुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. 

जिल्ह्यातील 36 रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार सेवा दिली जाते. यात जवळपास 960 हून अधिक आजारांवर मोफत उपचार होतात. ही योजना चालविणारे बहुतांश दवाखाने कोल्हापूर शहरात आहेत. 

डोंगरी ग्रामीण तालुक्‍यात जंगली भागात अनेक वाड्या-वस्त्या आहेत. येथे वन्यजीवांकडून होणाऱ्या हल्ल्यातील जखमींपासून ते पक्षाघात, मेंदू, मणका, फुफ्फुसाचे आजार, किडनी, हृदयविकाराने त्रस्त असलेले रुग्ण आहेत. त्यांना सध्या मोजक्‍या रुग्णालयांत उपचार सेवा मिळते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे काही दवाखाने बंद आहेत. म्हणून त्यांना दूर अंतराच्या दवाखान्यात यावे लागते आहे. यातही योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास आजरा, चंदगड तालुक्‍यातील व्यक्तींना गडहिंग्लज येथे यावे लागते. 

गगनबावडा, शाहूवाडी तालुक्‍यात योजना असलेला दवाखाना नाही. त्यामुळे येथील रुग्णांना पन्हाळा तालुक्‍यातील कोडोलीतील दवाखान्यात यावे लागते. भुदरगड तालुक्‍यात एकाच दवाखान्यात योजना घेतली आहे; मात्र अजून ती सुरू झालेली नाही. शिरोळ तालुक्‍यातील रुग्णांना कुरुंदवाड किंवा इचलकरंजीतील रुग्णालयात जावे लागते. 
या सर्वांचा अर्थ असा की, डोंगरी, दुष्काळी व जंगली तालुक्‍यात अनेक भागातील गरजू घटकांची संख्या जास्त आहे. त्यांच्यापर्यंत महात्मा फुले जनआरोग्य योजना पोचविण्यासाठी अडथळे येत आहेत. 

अतिगंभीर आजारातील रुग्णांना योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास अनेकांना सीपीआर रुग्णालय किंवा शहरातील खासगी रुग्णालयात यावे लागते. यात महात्मा फुले योजनेत मोफत उपचार होतात; मात्र अनेक गैरसोयी सोसत घरातील अन्य व्यक्तींना येथे थांबावे लागते आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर किमान प्रत्येक तालुक्‍यात खासगी रुग्णालयात उपचारपूरक सुविधा सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील खासगी डॉक्‍टरांनी ग्रामीण भागातील उपचार सेवा सुरू केल्यास योजनेचा लाभ पोचविता येणे शक्‍य होणार आहे. 

लॉकडाउन संपल्यानंतर पूर्ण क्षमतेने सेवा
ग्रामीण डोंगरी भागात खासगी रुग्णालयांची संख्या कमी आहे. तरीही जिथे दवाखाने आहेत तिथे योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाउनमुळे काही रुग्णालये बंद होती, तीही सध्या सुरू झालेली आहेत. तेथे इतर आजारातील गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाउन संपल्यानंतर पूर्ण क्षमतेने उपचार सेवा सुरू होईल. 
- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com