पन्हाळ्याच्या वृक्ष संग्रहालयाला लागली घरघर ; वन खात्याचे दुर्लक्ष अन् विद्यार्थ्यांचीही पाठ

tree museum of panhala face problem and corporation ignore in kolhapur
tree museum of panhala face problem and corporation ignore in kolhapur

पन्हाळा (कोल्हापूर) : ऐतिहासिक पन्हाळगडावरील तीन दरवाजाशेजारील वृक्ष संग्रहालयात विविध जातींची औषधी, फळांची भरपूर झाडे तरारून आलेली; पण आता परिस्थितीपुढे शरण जाणारी. संग्रहालयाभोवती तारेचे कुंपण, तारा गंजून तुटलेल्या, लावलेले गेट, फलकांचा पत्ता नाही अन्‌ झाडांचा अभ्यास करण्यासाठी येणारे विद्यार्थीही इकडे फिरकेनात. कारण स्पष्ट आहे. इथे वावर आहे, फक्‍त जनावरांचा, त्यांच्या शिंगांनी मोडलेल्या दुर्मिळ जातीच्या झाडांचा व वाळून पडलेल्या फांद्यांचा. 

करपाडी नावाच्या जागेचा वापर पूर्वी गायरान म्हणून व्हायचा. गावातील पाळीव जनावरे चरायची. लोक गवत कापून न्यायचे. गावातील ईस्माईल मोकाशी (राईट) या वृक्षवेड्याने नोकरी सांभाळत झाडे लावून बाटलीतील पाण्याने जगवायला सुरवात केली. तत्कालिन नगराध्यक्ष विजय पाटील यांना ही धडपड आवडली आणि त्यांनी या परिसरात झाडे लावण्याचा निर्णय घेतला; पण वन खात्याची जमीन असल्याने सहजासहजी परवानगी मिळणार नव्हती. म्हणून पाटील तत्कालिन वन संरक्षकांना भेटले. त्यांनी सकारात्मक विचार करत नगर परिषद, सामाजिक वनीकरण आणि वन खाते यांच्यातर्फे झाडे लावायची ठरवली.

नगर परिषदेने झाडे लावायची व जगवायची आणि तीन वर्षांनी ती वन खात्याच्या ताब्यात द्यायची, असा करार झाला. २००४ मध्ये सात एकर परिसरात २५० प्रकारची तीन हजार झाडे लावली. त्यांना साधोबा तलावातून पाईपलाईनने पाणीपुरवठा केला. परिसराला तारेचे कुंपण लावले. नगर परिषदेचे कर्मचारी तीन वर्षे राबले. झाडे तरारली. पर्यटक, निसर्गप्रेमी, अभ्यासक वृक्ष संग्रहालयाला भेट देऊ लागले आणि पन्हाळ्यातील तो एक महत्त्वाचा पॉईंट ठरला. संग्रहालय ठरल्याप्रमाणे वन खात्याकडे गेले. तरीही नगर परिषदेचा पाणीपुरवठा सुरू राहिला. खात्याने पाण्याची टाकी तेवढी बांधून घेतली. 

कालांतराने वन खात्याचे दुर्लक्ष होऊ लागले. निधी नाही या सबबीखाली रोजंदारीवरील कर्मचारी कमी झाले. तारेचे कुंपण गंजून तुटले, गेटही मोडले, मोकळी जनावरे झाडांची मोडतोड करू लागली. पाण्याअभावी काही झाडांनी माना टाकल्या. आज परिसराची अवस्था दयनीय झाली आहे; पण त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

"वन खात्याकडे निधी नाही. तरीही वन व्यवस्थापन समितीतर्फे निधी गोळा करून दोन महिन्यांत तारेचे कुंपण घालण्याचा तसेच असलेली झाडे जगविण्याचा प्रयत्न केला जाईल."

- प्रियांका दळवी, परिक्षेत्र वनाधिकारी

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com