आजरा-चंदगड रस्त्यावर टस्कर हत्ती

रणजित कालेकर
Tuesday, 5 January 2021

आजरा-चंदगड रस्त्यावर जेऊर गावानजीक रस्ता ओलांडताना वाहनधारकांना टस्कराचे दर्शन झाले.

आजरा : आजरा-चंदगड रस्त्यावर जेऊर गावानजीक रस्ता ओलांडताना वाहनधारकांना टस्कराचे दर्शन झाले. गेले आठ दिवस त्याचा या परिसरात वावर आहे. रस्त्याच्या दुतर्फा जंगल परिसर असल्याने टस्कर कधी समोर हजर होईल, याची शाश्‍वती नसल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. वन विभाग त्याच्या पाळतीवर आहे. त्याच्याकडून पिकांचे नुकसान मात्र दररोज सुरू आहे. 

चाळोबा जंगलाच्या परिसरातून टस्कर चितळे, कासारकांडगावच्या जंगलात दाखल झाला आहे. येथील ऊस, केळी, बांबूचे पीक तो फस्त करीत आहे. त्याच्या वावराने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळच्या वेळी तो जंगलातून बाहेर पडतो. शेतात उतरून नुकसान करतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी राखणीला जाणे बंद केले आहे. त्याने येथील पेडणेकर व त्रिभुवने फार्म हाउसवरील नारळ, केळीच्या झाडांचे नुकसान केले.

त्याचबरोबर परिसरातील ऊस, बांबूची पिके तो फस्त करीत आहे. तो रस्त्यावर अचानकपणे येत असल्याने वाहनधारकांत भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वावरणे धोकादायक झाल्याचे वाहनधारक सांगतात. नेमीनाथ त्रिभुवने, विजय त्रिभुवने, शशिकांत त्रिभुवने आणि सचिन सरदेसाई यांच्या ऊस, केळी व नारळ पिकांचे नुकसान झाले आहे. 

पेरणोली-वझरे रस्त्यावर गव्यांचा कळप 
पेरणोली-वझरे रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी गव्यांचा कळप रस्ता ओलांडताना दिसला. या मार्गावरून चाललेल्या एका वाहनधारकाला दुपारी दीडच्या सुमाराला त्याचे दर्शन झाले. तो जंगलाच्या दिशेने गेल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतात काम करणे अवघड
टस्कर या परिसरात गेले आठ दिवस ठाण मांडून आहे. माझ्या शेतातील केळी, सुपारी, नारळ, उसाचे नुकसान केले आहे. त्याच्या दहशतीने शेतात काम करणे अवघड बनले असून रात्रीच्या वेळी शेतातील फॉर्म हाऊसवर थांबणे ही धोकादायक बनले आहे. 
- हेमंत पेडणेकर, जेऊर, आजरा 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tusker Elephant On Ajara-Chandgad Road Kolhapur Marathi News