
कोल्हापूर ः गणेशोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या गावात, असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव व मोहरम हे सण यंदा एकत्र येत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली आहे. यंदा आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे. शासनाच्या नियमावलीचे पालन सर्व सार्वजनिक मंडळांनी करावे, असे आवाहन पोलिस यंत्रणेकडून केले आहे. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकाही घेण्यात आल्या आहेत.
प्लाझ्मा दान, रक्तदान शिबिर, व्हेंटिलेटर भेट, अशा विधायक उपक्रमांनी यंदाचा हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करा. आगमनादिवशीची गर्दी कमी करण्यासाठी "चार पाच दिवस आधीच मूर्ती घेऊन जा' असे आवाहन पोलिस यंत्रणेने केल आहे. त्याला अनेक मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. साधेपणाने यंदाचा उत्सव साजरा करू, असे हजारो मंडळांनी जाहीर केले आहे.
गणेश चतुर्थी उद्या (ता. 22) आहे. या उत्सवासाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेबरोबर, दर्शनाला गर्दी होणार नाही, याची दक्षता, कोणाकडून नियमांचा भंग होतोय का? यावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. शहरातील सीसीटीव्हीचीही यासाठी मदत घेतली जाणार आहे. प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांकडून हद्दीत लक्ष ठेवण्यात येणार आहे.
असा राहील पोलिस बंदोबस्त...
पोलिस कर्मचारी - 2400
पोलिस अधिकारी - 120
स्ट्रायकिंग फोर्स - 16
आरएसपी दल - 3
होमगार्ड - 700
एसआरपीएफ प्लाटून - 1
-------
मुख्य चौकात फिक्स बंदोबस्त
कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यातील गर्दी होणाऱ्या चौकात तंबू टाकून तेथे फिक्स बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथून भागातील सर्व मंडळांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
गस्ती पथकांची नेमणूक
शहरासह जिल्ह्यातील संवदेशनील अशा भागात स्थानिक पोलिसांची रात्रीसह दिवसाचीही गस्त उत्सव काळात राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या पालनासह इतर अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
शहराची होणार तपासणी...
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, इचलकरंजी या शहराची दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक व श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
वाहतुकीचे नियोजन
आगमना दिवशी कुंभार गल्लीत गर्दी होऊ नये, यासाठी त्या त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून शहरातील पापाची तिकटी, गंगावेश, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प आदी ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच संबंधित भागात वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कोट ः
मोहरम, गणेशोत्सवात प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळावे. कोरोना संकटापासून दूर राहून महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन कुंडामध्येच मूर्तीचे विसर्जन करावे.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.