मंत्र्यांनी मनावर घ्यावे, कष्टकऱ्यांच्या पोटात दोन घास पडावे.... 

शिवाजी यादव
बुधवार, 1 जुलै 2020

10 रूपयात शाहू भोजन थाळी देण्याबाबत जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत तयारी केली. राज्य शासनाच्या मंजूरी अभावी शाहू भोजन थाळी सध्या रिकामीच आहे.

कोल्हापूर : शेतीमाल खरेदी विक्रीच्या निमित्ताने रोज हजारो कष्टकरी शाहू मार्केट यार्डात येतात. येथे सौदे व्यवहारात कमी उत्पन्न घटकातील व्यक्ती असतात. अशा व्यक्‍तींना 10 रूपयात शाहू भोजन थाळी देण्याबाबत जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीत तयारी केली. राज्य शासनाच्या मंजूरी अभावी शाहू भोजन थाळी सध्या रिकामीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्र्यांनीच आता मनावर घेऊन कष्टकऱ्यांच्या पोटात दोन घास पडावेत, यासाठी प्रयत्न करावेत. 

राज्यातून तसेच परराज्यातून दररोज 150 ते 300 गाड्या शाहू मार्केट यार्डात येतात. प्रत्येक गाडीत एक चालक एक क्‍लिनर असतो. याशिवाय बाजारपेठेत रोजचे माथाडी, तोलाईदार, दिवाणजी पासून ते शेतीमालांची निट वाट करणारे कामगार असे जवळपास चार हजारांवर लोक रोज आहेत. त्यासोबत येणारे शेतकरी, किरकोळ विक्रेते अशा घटकांची बाजारपेठेत गर्दी असते.

बहुतेकांना कमीत कमी 200 ते 500 रूपये रोजची मजूरी असते. काहीना एक-दोन दिवस बाजारपेठेत राहण्याची वेळ येते, त्यांच्यासाठी निवासाची सोय आहे. मात्र जेवण खाणे, चहा, नाष्ट्याची सुविधा घेण्यासाठी खासगी हॉटेलचा आधार घ्यावा लागतो. यात गैरकाहीच नाही, मात्र खासगी हॉटेलमध्ये एका वेळी जेवणासाठी 60 ते 80 रूपये मोजावे लागतात. एवढे करून जेवणाचा दर्जा चांगला असेल याची खात्री नाही. त्यामुळे एक वेळी जेवण करणे दुसऱ्या वेळी वडापाव खाण्याची वेळ अनेकांवर येते. 
अशा सर्व घटकांना पोटभर पुरेसे अन्न शाहू थाळीमधून मिळू शकते. त्यासाठी बाजार समितीने तयारी दर्शवली. बाजार समिती जागा देण्यास तयार आहे. जवळपास 10 व्यक्तींनी शाहू भोजन थाळी सुरू करण्याचा प्रस्तावही नेला आहे. 

बाजार समितीने शाहू भोजन थाळी देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. राज्य शासनाकडून त्याला मंजूरी येण्याची प्रतिक्षा आहे. 
- नंदकुमार वळूंज, संचालक, बाजार समिती. 

दृष्टिक्षेप 
- मार्केट यार्डात दररोज हजारो कष्टकरी येतात 
- बऱ्याच जणांना एक-दोन दिवस राहण्याची वेळ 
- निवासाची सोय आहे, पण भोजनाचा खर्च परवडत नाही 
- बऱ्याच जणांना वडापाव खाऊन समाधान मानावे लागते 
- शाहू भोजन थाळी सुरू झाल्यास चांगली सोय होणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two grasses should fall in the stomachs of the toilers ....