कळंबा कारागृहातून पुन्हा दोन मोबाईल, सिमकार्ड जप्त; मोका’तील पाच जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021


सीसीटीव्ही आधारे झडती

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात काल ‘मोका’ अंतर्गत कारवाई केलेल्या पाच संशयितांकडून दोन मोबाईल संच, सिमकार्डसह दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. कारागृह प्रशासनाने सकाळी सीसीटीव्हीच्या मदतीने घेतलेल्या झडतीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी संशयितांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विकास रामअवतार खंडेलवाल, अभिमान विठ्ठल माने, शुक्रराज पांडुरंग घाडगे, अक्षय अशोक गिरी, युवराज मोहन महाडिक अशी त्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस व कारागृह प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी 

कळंबा कारागृहात गेल्या १५ दिवसांत १० मोबाईलसह गांजा फेकण्याचा प्रकार घडला. याची गंभीर दखल कारागृह प्रशासनाने घेतली. चंद्रमणी इंदूरकर यांनी अधीक्षकपदाची सूत्रे घेतल्यावर कारागृहाची वारंवार झडती घेण्यास सुरवात केली. सकाळी आठच्या सुमारास कारागृहाची पुन्हा झडती घेण्यात आली. त्यात ‘मोका’ अंतर्गत गुन्ह्यातील पाच संशयितांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. प्रशासनाने सीसीटीव्ही आधारे तपासणी सुरू केली. यात ‘मोका’ अंतर्गत कारवाईतील संशयित विकास खंडेलवाल, अभिमान माने, शुक्रराज घाडगे, युवराज महाडिक व अक्षय गिरी या पाच जणांची स्वतंत्ररीत्या चौकशी केली. यात प्रशासनाला मोबाईलचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात यश आले. 

मोबाईल लपविण्यासाठी स्वच्छतागृहाचा आधार
प्रशासनाने केलेल्या चौकशीत खंडेलवाल, माने, घाडगे, गिरी व महाडिकने सर्कल क्रमांक पाच बरॅक क्रमांक एक व पाचमधील स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस दुधाच्या रिकाम्या पिशवीत मोबाईल बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तो मोबाईल ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर संशयित गिरीची अंगझडती घेण्यात आली. त्यात एक मोबाईल संच, सीमकार्ड व बॅटरी मिळून आली. प्रशासनाला एकूण दोन मोबाईल, एक सीमकार्डसह दोन बॅटऱ्या मिळाल्या, अशी फिर्याद कारागृह प्रशासनातर्फे वरिष्ठ तुरुंग अधिकारी साहेबराव आडे यांनी दिली. 

हेही वाचा- चुलीवरचं जेवण जगात भारी, आता पंजाबी किंवा पाश्‍चात्त्य पद्धतीचं जेवण विसरा -

तपास गतिमान होण्याची शक्‍यता
कारागृहात आतापर्यंत सापडलेले मोबाईल हे सीम व्यतिरिक्त होते; पण पहिल्यांदाचा सीमकार्ड असलेला मोबाईल प्रशासनाच्या हाती लागला. याआधारे कारागृहात कोणाच्या माध्यमातून व कशा पद्धतीने मोबाईल येतात, त्याचा वापर कसा केला जातो, अशा अनेक प्रश्‍नांचा उलगडा होण्याची शक्‍यता आहे. 

पंधरा दिवसांत हे सापडले
ता. २२ डिसेंबर ः १० नवे मोबाईल, गांजा, चार्जर, कॉड व दोन पेन ड्राईव्ह
ता. २५  ः एक मोबाईल आणि चार बॅटऱ्या 
ता. ३१  ः एक मोबाईल आणि तीन बॅटऱ्या
ता. ५ जानेवारी ः दोन मोबाईल संच, सीमकार्डसह दोन बॅटऱ्या

झडतीची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. आज झडतीत 
पाच जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.  
- चंद्रमणी इंदूरकर, कारागृह पोलिस अधीक्षक

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two mobiles and a SIM card seized from Kalamba jail