कोल्हापुरात एनडीआरएफची आणखी दोन पथके दाखल

Two more NDRF squads arrived in Kolhapur
Two more NDRF squads arrived in Kolhapur

कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी धोक्याच्या म्हणजेच ४३ फुटांच्या जवळ पोहोचली  आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पंचगंगेची पातळी दुपारी १२ वाजता ४२. ५ वर पोहोचली आहे. त्यामुळे कोल्हापुरा गतवर्षीसारखाच पाऊस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर कोल्हापुरात आज आणखी दोन एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. 

या दोन पथकातील  प्रत्येक पथकात २२ जवानांचा समावेश आहे. यातील एक पथक कोल्हापुरात तर दुसरे शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे पोहचले आहे. दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली होती. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफची पथके पाठवली जावीत यासाठी आग्रह केला होता.  

धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा आणि कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर या धरणाखाली येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे.

सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह जवळपास सर्व नद्या खालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवत असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडी आरएफची पथके  मिळावीत अशी मागणी केली होती.

  बैठकीनंतर मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफ ची दोन पथके तातडीने कोल्हापूर कडे रवाना करण्यासाठीचे आदेशआपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले होते. यानंतर संचालक येवलकर यांनी एनडीआरएफच्या पुणे येथील प्रमुखांना एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरला रवाना करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज ही दोन्ही पथके कोल्हापुरात दाखल झाली. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com