कोल्हापूरातल्या दोन खासदारांमध्ये विमानतळावरून खडाखडी.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two MPs dispute over Kolhapur airport advisory committee meeting

कोल्हापूर विमानतळाच्या सल्लागार समितीच्या बैठकीवरून दोन खासदारांचा वाद आता चव्हाट्यावर येत आहे. गत महिन्यात होणारी पहिलीच बैठक रद्द झाली.

कोल्हापूरातल्या दोन खासदारांमध्ये विमानतळावरून खडाखडी....

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळाच्या सल्लागार समितीच्या बैठकीवरून दोन खासदारांचा वाद आता चव्हाट्यावर येत आहे. गत महिन्यात होणारी पहिलीच बैठक रद्द झाली. आज (ता. २०) सकाळी ११ वाजता कोल्हापूर विमानतळावर बैठकीचे आयोजन केले आहे; मात्र बैठकीस उपस्थित राहू न शकणारे खासदार संभाजीराजे यांनी बैठकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत असल्याने बैठक दोन दिवस पुढे घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला होता; मात्र याला न जुमानता समितीचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी उद्या बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्याची बैठक घेण्याचा निर्णय सात दिवसांपूर्वीच घेतला होता. उद्या होणाऱ्या बैठकीत सर्वांनी हजर राहण्याची पत्रे सर्व संबंधित समिती सदस्यांना दिली. विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांच्या सहीने ही पत्रे सर्वांना दिली आहेत.

वाचा - महागावसाठी 35 लाखांचा निधी : मुश्रीफ 

पत्रानंतर खासदार संभाजीराजे यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीत असल्याने बैठक आणखी दोन दिवस पुढे घ्यावी, अशी विनंती केली होती; मात्र या विनंतीला न जुमानता बैठक होणार आहे. याबाबत खासदार संभाजीराजे यांनी माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली आहे. मी केलेल्या प्रयत्नामुळे विमानतळ सुरू झाले आहे, केवळ प्रसिद्धीसाठी बैठक घेतली जात असल्याचेही त्यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे. यामुळे सल्लागार समितीची पहिलीच बैठक होण्याअगोदर दोन खासदारांमधील वाद उफाळून आल्याचे दिसून येते.

अनेक वेळा विनंती करून सुद्धा आज (ता.२०) होणारी विमानतळाची बैठक शनिवारी (ता.२२) घेण्याची विनंती केली होती. विमानतळाच्या सर्व परवानग्या आणायला मी कष्ट करायचे. दिल्लीत शिवजयंतीच्या कार्यक्रमांमुळे मला उपस्थित राहता येणार नाही. बैठक फक्त दोन दिवस पुढे घ्या, अशी मागणी केली असताना, ती मान्य होऊ नये? वाईट याचं वाटतं की, फक्त श्रेय लाटू लोकांच्या सोयीसाठी बैठका होत आहेत. माझा स्वभाव नाही, की केवळ प्रसिद्धीसाठी काही करायचं. कोल्हापूरकरांची सेवा करणं हा माझा वसा, वारसा आहे, तो मी यापुढेही सुरूच ठेवणार.
- संभाजीराजे, खासदार