
गोवा राज्याची सीमा जवळ असल्याने गडहिंग्लज उपविभागात दारूच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. ही तस्करी रोखण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर नेहमीच आव्हान असते. त्यातच आता थर्टी फर्स्ट आणि ग्रामपंचायत निवडणुकांची भर पडली आहे.
गडहिंग्लज : गोवा राज्याची सीमा जवळ असल्याने गडहिंग्लज उपविभागात दारूच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. ही तस्करी रोखण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर नेहमीच आव्हान असते. त्यातच आता थर्टी फर्स्ट आणि ग्रामपंचायत निवडणुकांची भर पडली आहे. उत्पादन शुल्क विभागाने आधी थर्टी फर्स्टवर लक्ष केंद्रित केले आहे. दारूची तस्करी रोखण्यासाठी सीमेवर दोन नाके उभे केले आहेत, तर दोन गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे.
गडहिंग्लज उपविभागाच्या एका बाजूला गोवा राज्य, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकची सीमा आहे. त्यामुळे गोवा बनावटीच्या विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. महाराष्ट्रात मिळणारी दारू आणि गोवा बनावटीच्या दारूच्या किमतीतही फरक आहे. त्याचाही परिणाम तस्करी वाढण्यावर झाला आहे. ही तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. तुलनेत गेल्या दोन वर्षांत तस्करी काही प्रमाणात कमी झाली आहे; पण ती संपूर्णपणे रोखणे मुश्किल आहे.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दारूची तस्करी वाढते. ही बाब लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाने गवसे (ता. आजरा) व तिलारी (चंदगड) येथे नाके उभे केले आहेत. या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे जवान तैनात केले आहेत. संशयास्पद वाहनांची 24 तास तपासणी केली जात आहे. याशिवाय दोन गस्ती पथके तयार केली आहेत. या पथकांकडूनही संशयास्पद ठिकाणांची पाहणी, वाहनांच्या तपासणीचे काम सुरू आहे. गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या तस्करीला अटकाव घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील 50, आजऱ्याच्या 26, तर चंदगडमधील 41 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीत दारूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी उमेदवारांकडून गोवा बनावटीच्या विदेशी दारूला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे निवडणुकांच्या काळात दारूच्या तस्करीत वाढ होते. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाकडून अद्याप स्वतंत्र नियोजन झालेले नाही; मात्र थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने उभे केलेले नाके, गस्ती पथके कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चार तालुक्यांना आठ कर्मचारी
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गडहिंग्लजला कार्यालय आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांचा कारभार येथून हाकला जातो. एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, एक हवालदार, तीन जवान व एक चालक असे अवघे आठच कर्मचारी कार्यरत आहेत. पूर्वी या कार्यालयांतर्गत तीन तालुके होते. यामध्ये आणखी एका तालुक्याची भर पडली आहे; मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांवरच कारभार चालवावा लागत आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur