लॉकडाऊनमध्ये दोघांनी चोरल्या तब्बल 15 दुचाकी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळींचा तपास सुरू असताना या दोघांची माहिती पोलिस नाईक तुकाराम राजीगरे यांना कळाली.

कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळात दुचाकी चोरणाऱ्या दोन तरुणांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अवधुत लहु धुरे (वय 20, रा.फये, ता.भुदरगड) आणि तुळशीदास अर्जुन पाटील (वय 21, रा. भेंडवडे, ता. भुदरगड) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या 15 दुचारी जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांनी शहरासह आसपासच्या परिसरातून या दुचाकी चोरल्या होत्या. चोरीची दुचाकी विकण्यासाठी आले असताना त्यांना अटक करण्यात आली. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली. 

यावेळी सावंत म्हणाले, जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळींचा तपास सुरू असताना या दोघांची माहिती पोलिस नाईक तुकाराम राजीगरे यांना कळाली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार, पोलिस अंमलदार पांडुरंग पाटील, विठ्ठल माणकेजी यांनी या दोघांचा शोध सुरू केला. हे दोघे सोमवारी (ता.26) तपोवन मैदानावर नंबर प्लेट नसणारी दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तेथे जावून सापळा रचला व या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 15 दुचाकी सापडल्या. सर्व दुचाकी या हिरोहोंडा स्प्लेंडर आहेत. जुना राजवाडा, शाहुपूरी आणि भुदरगड पोलिस ठाण्यात दाखल असणाऱ्या फिर्यादीमध्ये ज्या क्रमांकाच्या दुचाकी होत्या त्याच दुचाकी या निघाल्या. दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, रणजीत कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, अनिल जाधव, रफिक आवळकर, अजय काळे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. 

हे पण वाचादसरा नव्हे, हे तर  शिमग्याचे भाषण ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्याना टोला  

बी.एस.सी करणारा तरुण गुन्हेगारीकडे 
तुळशीदास पाटील हा बी.एस.सीचे शिक्षण घेत आहे. अवधुत गाडी चोरायचा आणि तुळशीदास ती विकण्यास ग्राहक शोधायचा असा त्यांचा धंदा सुरू होता. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या तुळशीदासला अवधुतने या गुन्हेगारीकडे वळवले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two stole 15 bikes in the lock down in kolhapur