सुपारी देऊन काकाने केला पुतण्याचा खून ; हाती मिळाली केवळ कवटी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

निपाणी पोलिसांनी केवळ महिन्याभरातच या खून प्रकरणाचा उलगडा केल्याने परिसरासह जिल्हा पोलिस प्रमुखांकडून अभिनंदन होत आहे.

निपाणी : मालमत्तेची वाटणी, व्यसनाधिनता आणि इतर कारणांमुळे सुपारी देऊन काकाने पुतण्या विशाल पाटील याचा खून केल्याची घटना बेनाडी येथे मंगळवारी (ता. २७) उघडकीस आली. या प्रकरणी पाच जणांना अटक करून काकासह एकाची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. 

काका सतीश दादासाहेब पाटील ( वय ४५, रा. बेनाडी), अमोल प्रकाश वड्डर (वय ३६, रा. बेनाडी), दिलीप परशुराम वड्डर (वय ३८, रा. व्हनाळी, ता. कागल), विकास वकील पाटील (वय २५, रा. खेबवडे, ता. करवीर) आणि बाबासाहेब पांडुरंग कांबळे (वय ४७, रा. व्हनाळी, ता. कागल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

निपाणी पोलिसांनी केवळ महिन्याभरातच या खून प्रकरणाचा उलगडा केल्याने परिसरासह जिल्हा पोलिस प्रमुखांकडून अभिनंदन होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बेनाडी येथील विशाल पाटील (वय २५) हा आपल्या काकाजवळच रहात होता. यापूर्वी त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. विशाल याला आपल्या मालमत्तेचा वाटा हवा होता. त्यावरून वारंवार  काका सतीश पाटील व त्याच्यामध्ये  वाद सुरू होता. महिन्यापूर्वी तो आपली कार घेऊन धुण्यासाठी गेला होता. पण तो परत न आल्याने काका सतीश पाटील यांनी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये महिन्यापूर्वी विशाल हा कार घेऊन बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार निपाणी पोलिसांनी सर्वजणांनी कार आणि विशालचा शोध घेतला.  त्याची कार सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याजवळ एका तलावाच्या शेजारी मिळून आली.

दरम्यान, काही दिवसानंतर सतीश पाटील यांना चौकशीसाठी ग्रामीण पोलिसांनी बोलवूनही ते न आल्याने खुद्द उपनिरीक्षक व सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली. यावेळी मात्र सतीश पाटील यांनी विशाल पाटील हा आपला पुतण्या व्यसनाधिन निघाला असून वारंवार भांडण करत आहे. शिवाय मालमत्तेमध्ये वाटणी मागत असल्याचे सांगून आपणच त्याचा सुपारी देऊन खून केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यासाठी इतरांची मदत घेतली होती. आपल्या घरामध्ये खताची पोती उचलण्यासाठी विशालला बोलावून त्यानंतर दबा धरून बसलेल्या सहकार्‍यांसमवेत त्याचा गळा दाबून खून केल्याचे सतीश पाटील यांनी सांगितले. त्यानंतर विशालच्या कारमध्ये त्याचा मृतदेह घालून गगनबावडा येथील घाट परिसरात टाकून दिल्याचे स्पष्ट केले. पोलिसांचा तपास सुरू असताना सतीश पाटील यांनी ठरलेल्या सात लाखांच्या सुपारीमधील दीड लाखाची रक्कम आरोपींना टप्प्याटप्प्याने दिली. त्यानंतर काम झाल्यावर साडेचार लाख रुपये दिले होते. या सर्व माहितीच्या आधारे सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सतीश पाटील व आणखी एका आरोपीची हिंडलगा येथील कारागृहात रवानगी केली आहे. तर उर्वरित तीन आरोपींचा रिमांड घेऊन आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याची चाचपणी पोलिस करीत आहेत.
या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, अतिरिक्त पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोज कुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक, ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये एस. ए. तोलगे, असगर तहसीलदार, प्रकाश सावजी, संजय काडगौडर, एल. एस. कोचरी, प्रवीण करजगी, कलगोंडा पाटील यांच्यासह सहकारी या कारवाईत सहभागी झाले होते.

निपाणी भागात प्रथमच सुपारी किलर

निपाणी भागात कुटुंबातील वादामुळे सुपारी देऊन खून केल्याची ही पहिलीच घटना आहे. तरीही निपाणी पोलिसांनी केवळ एकाच महिन्यात या खुनाचा उलगडा केला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातही सुपारी किलर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे पण वाचादेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भेटायला कोरोनाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खोचक टोला

फिर्यादीच निघाला आरोपी

विशाल पाटील हा आपला पुतण्या कार घेऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद काका सतीश पाटील यांनी ३० सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी विविध अंगानी तपास केल्यानंतर फिर्याद देणारा काकाच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

हे पण वाचादसऱ्याचे नव्हे शिमग्याचे भाषण ; चंद्रकांत पाटीलांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली

हाती मिळाली केवळ कवटी

तब्बल महिन्यापूर्वी विशालचा खून करून बावडा परिसरातील घाट भागामध्ये त्याचा मृतदेह फेकून दिला होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपी समवेत संबंधित भागाची पाहणी करून आल्यानंतर पोलिसांना केवळ विशालची कवटी मिळाली. या घटनेमुळे बेनाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle killed nephew in nipani belgaum