युनायटेड चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल शनिवारपासुन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे युनायटेड चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.29) फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. बारा वर्षाखालील वयोगटासाठी दोन दिवस होणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर, मिरज, बेळगाव, कोल्हापूर, निपाणी आणि स्थानिक संघांचा सहभाग आहे. म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होईल.

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे युनायटेड चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.29) फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. बारा वर्षाखालील वयोगटासाठी दोन दिवस होणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर, मिरज, बेळगाव, कोल्हापूर, निपाणी आणि स्थानिक संघांचा सहभाग आहे. म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होईल. 

मोबाईल, टीव्ही ,कॉम्प्युटर या मनोरंजनाच्या साधनामुळे लहान मुलांचा मैदानावरील वावर कमी होत आहे. त्यामुळे नव्या पिढीत आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे लहान मुलांनी मैदानावर खेळण्यासाठी परतावे यासाठी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. गेल्या दोन वर्षापासून बालपणीच विद्यार्थ्यांत खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बेबी लिग स्पर्धा होते. आठ, दहा आणि बारा वर्षे अशा तीन गटातील स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम महाराष्ट्रातील ही एकमेव बेबी लीग फुटबॉल स्पर्धा आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बेबी लिगद्वारेच फुटबॉल खेळाचा श्रीगणेशा केला. 

आता याच बारा वर्षे वयोगटातील खेळाडूना बाद पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेची स्पर्धेची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धा शनिवारी दिवसभर साखळी पद्धतीने तर रविवारी सकाळी सेमी फायनल तर सायंकाळी फायनल सामना होईल. सहभागी होणाऱ्या खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी 2008 (वय 12 )नंतरची असावी. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघासह सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, मध्यरक्षक, बचावपटू आणि आघाडीपटू अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता या स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. रविवारी सायंकाळी पाच वाजता अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. तरी नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद बारदेस्कर, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन बेलद यांनी केले आहे. स्पर्धा समन्वयक ओंकार सुतार, रितेश बदामे हे स्पर्धेचे नियोजन करीत आहेत. 

खेळाडूंना अधिक खेळण्याची संधी 
साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना अधिकाधिक सामने खेळायला मिळावेत, अशी रचना आहे. सेव्हन साईड पद्धतीने ही स्पर्धा असुन प्रत्येक संघात दहा खेळाडू असतील. खेळाडूंची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार ही लहान ठेवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Champs Trophy Football on Saturday Kolhapur Marathi News