कोल्हापूरच्या घरांमध्ये कशी आली लाईट ? वाचा 'लाईट'ची अनटोल्ड स्टोरी...

Untold Story of light come in the houses of Kolhapur
Untold Story of light come in the houses of Kolhapur

संस्थानी कोल्हापुरात सायंकाळ व्हायच्या वेळी आताच्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याजवळच्या इमारतीत गडबड उडालेली असे. शिड्या, सायकली आणि रॉकेलचे शिसे घेऊन पालिकेचे कामगार लगबगीने त्यांना नेमून दिलेल्या भागातले दिवे पाजळायला निघत. रस्त्यांवर आणि चौकात रॉकेलचे मिणमिणते दिवे लावले जायचे. १९२० मध्ये दिवाबत्ती खात्यावर पालिकेने नगद रु. ७४६४  खर्च केलेला होता. रॉकेलच्या दिव्यांचा हा प्रकाश अगदी जेमतेम असे. 

छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरला उद्योग नगरी बनवण्याची तळमळ होती. विजेमुळं होणारी औद्योगिक प्रगती त्यांनी पुण्या-मुंबईत बघितलेली होती; पण कोल्हापुरात वीज नसल्यानं इथले उद्योग मागे पडत होते. त्याचवेळी कोल्हापूरच्याच महादेव विठ्ठल तांदळे आणि उपळावीकर बंधूंनी महाराजांची भेट घेऊन वीज कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी मागितली. ही गोष्ट त्या काळात नवीन होती; पण नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींना महाराजांचा नेहमीच पाठिंबा असे. महाराजांनी १८ जून १९१२ ला हुकूम काढून या मंडळींना वीजनिर्मितीचा परवाना दिला. शिवाय, पुढची २५ वर्ष वीज निर्मितीचा मक्ताही दिला. पण महाराज अतिशय धोरणी होते. त्यामुळं त्यांनी या कंपनीने विजेचे दर मन मानेल तसे लावू नयेत म्हणून दर ठरवताना कोल्हापूर दरबारची मंजुरी घेण्याची अटही ठेवली.

वीजनिर्मितीचा परवाना मिळाला तरी प्रत्यक्ष वीजनिर्मितीसाठीची पूर्वतयारी करणे आणि त्यासाठीची यंत्रसामुग्री मिळवणे या प्रयत्नात बराच वेळ मोडला. दरम्यान, पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ही यंत्रसामुग्री भारतात आणणं दुरापास्त होऊन हा प्रकल्प रेंगाळला. कोल्हापुरात वीज नसली तरी नव्या राजवाड्यात डिझेल जनरेटर वापरून १९१५ च्या आसपास वीज आणली गेली होती.

महायुद्ध संपून सगळं स्थिरस्थावर झाल्यावर तांदळे आणि उपळावीकर पुन्हा जोमानं कामाला लागले आणि जवळपास पाच लाखांच्या भांडवलावर वीजकंपनी सुरू झाली. विजेची निर्मिती गॅसच्या सहाय्याने इंजिने चालवून केली जाई. प्रत्येक युनिटमागे विजेचा दर औद्योगिक वापरासाठी २१/२ आणे, घरगुती वापरासाठी आठ आणे आणि सरकारी इमारतींसाठी सात आणे होता. दर एवढे चढे असल्याने या विजेचा वापर घरगुती वापराऐवजी मुख्यतः उद्योगासाठीच होई.

१९२९ मध्ये कागलच्या बापूसाहेब महाराजांनी कोल्हापुरात दुसरी वीज कंपनी सुरू केली. या कंपनीचं पॉवरहाऊस शाहू स्मारकपाशी होतं. यांनी डिझेलची मोठी इंजिने वापरून वीजनिर्मिती सुरू केली. लोकांनी घरात वीज घ्यावी म्हणून जाहिरातही सुरू केली. घरगुती वीजजोडणी घ्यायला पन्नास रुपये खर्च येई. एखाद्या घरात लाईट आली की तो लख्ख प्रकाश बघायला सगळी गल्ली जमायची. घरातल्या मंडळींचा रुबाब वाढायचा. तरीही विजेचे दर चढेच असल्यानं फारशा घरात ती नव्हतीच. नगरपालिकेने काही मोजक्‍या रस्त्यांवर ‘ग्लोब’ लावलेले होते. पांढराफेक प्रकाश देणारा ‘पाईप’ कोल्हापुरात स्वातंत्र्याच्या काही काळच आधी आला, तेेव्हा त्याला बघायला बिंदू चौकातल्या पवारांच्या दुकानात झुंबड उडालेली होती.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com