
गडहिंग्लज शहरातील लक्ष्मी रोडसह इतर भागांत बसून भाजी विक्री करणारे विक्रेते आज पालिकेने ठरवून दिलेल्या मुलींच्या हायस्कूलजवळील जागेत स्थलांतरित झाले.
गडहिंग्लज : शहरातील लक्ष्मी रोडसह इतर भागांत बसून भाजी विक्री करणारे विक्रेते आज पालिकेने ठरवून दिलेल्या मुलींच्या हायस्कूलजवळील जागेत स्थलांतरित झाले. यामुळे लक्ष्मी रोड परिसर रिकामा झाला होता. परिणामी वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. सर्व विक्रेत्यांनी नव्या जागेत व्यवसाय सुरू केल्याने ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीचे केंद्र बनलेल्या लक्ष्मी रोड परिसर हातगाड्यावरून फळ विक्री करणाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी व्यापला होता. यामुळे या रस्त्यावरून चालत जाणेही मुश्कील ठरत होते. वाढत्या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोकाही होता. यामुळे पालिका प्रशासनाने आजपासून तात्पुरत्या स्वरूपात फळ आणि भाजी विक्रेत्यांना मुलींच्या हायस्कूलजवळील खुल्या जागेत स्थलांतरित होण्याची सूचना केली होती.
त्यानुसार आजपासून त्याची कडक अंमलबजावणी सुरू झाली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही अंमलबजावणी आज केली. सर्व भाजी विक्रेते यांनी नव्या जागेत बसून व्यवसाय केला. ग्राहकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. या निर्णयाने लक्ष्मी रोड परिसर रिकामा झाला आहे. सायंकाळच्या सुमारास या परिसरात शांतता होती. वाहतूकही सुरळीत सुरू होती.
फळ विक्रेते कुठे?
दरम्यान, फळ विक्रेते मात्र नव्या जागेत दिसत नव्हते. याबाबत पालिकेकडे विचारणा केली असता, या विक्रेत्यांनी आज व्यवसायच बंद केल्याचे सांगण्यात आले. नव्या जागेतही एकही फळविक्रेता आणि लक्ष्मीरोड परिसरातही हातगाडा दिसला नाही. यामुळे फळ विक्रेते एक, तर शहरातील विविध भागांत विखुरले असावेत किंवा व्यवसाय बंद केला असावा, अशी शंका व्यक्त केली; परंतु उद्यापासून हे विक्रेतेही स्थलांतरित होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur