खेड्यांना धास्ती "लॉकडाउन'नंतरची! 

अजित माद्याळे
शुक्रवार, 10 एप्रिल 2020

केंद्र शासनाने जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन संपण्यासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. म्हणजेच आता लॉकडाउनचे काउंटडाउन सुरू झाले आहे. लॉकडाउन शिथिल होणार की वाढणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. परंतु, लॉकडाउन शिथिल झालाच तर पुणे-मुंबईकर गावाकडे धाव घेण्याची शक्‍यता गृहीत धरून खेड्यांच्या दक्षता समित्यांना त्याची धास्ती लागली आहे. चाकरमानी गावाकडे आल्यानंतर त्यांना कुठे-कुठे क्वारंटाईन करायचे, याचे नियोजन दक्षता समितीचे पदाधिकारी आतापासूनच करीत आहेत.

गडहिंग्लज : केंद्र शासनाने जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाउन संपण्यासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. म्हणजेच आता लॉकडाउनचे काउंटडाउन सुरू झाले आहे. लॉकडाउन शिथिल होणार की वाढणार, याबाबत अद्याप संभ्रम आहे. परंतु, लॉकडाउन शिथिल झालाच तर पुणे-मुंबईकर गावाकडे धाव घेण्याची शक्‍यता गृहीत धरून खेड्यांच्या दक्षता समित्यांना त्याची धास्ती लागली आहे. चाकरमानी गावाकडे आल्यानंतर त्यांना कुठे-कुठे क्वारंटाईन करायचे, याचे नियोजन दक्षता समितीचे पदाधिकारी आतापासूनच करीत आहेत.

राज्याने लॉकडाउन घोषित केल्यानंतर काही पुणे-मुंबईकर गावाकडे परतले. त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यानंतर केंद्राने देशात लॉकडाउन केल्यानंतर काही चाकरमानी गावाकडे आले. 30 मार्चपर्यंत हे लोक गावात दाखल होत होते. सध्या चंदगडमध्ये 9 हजार 790, आजऱ्यात 11 हजार 48 तर गडहिंग्लज तालुक्‍यात दहा हजार चाकरमानी आले आहेत. अजूनही यातील निम्म्या चाकरमान्यांच्या क्वारंटाईनची मुदत संपायची आहे. 

दरम्यान, आता 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. लॉकडाउन शिथिल झालाच तर चाकरमानी गावाकडे धाव घेण्याची शक्‍यता आहे. मुळात सध्या या भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. आता कोरोना आला तरी तो बाहेरून आलेल्या व्यक्तीद्वारेच येणार आहे. यामुळे प्रशासनाने बाहेरील कोणीही व्यक्ती गावात आलीच तर त्याला बाहेर शाळेत किंवा मंदिरामध्ये क्वारंटाईन करण्याच्या सूचना प्रत्येक गावातील दक्षता समित्यांना दिल्या आहेत. 

पुणे आणि मुंबई, ठाणे ही शहरे आता कोरोनाबाधित रुग्णसंख्येत देशात पुढे आहेत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कदाचित हे लोक गावाकडे आलेच तर त्यांची व्यवस्था कुठे करायची, या नियोजनात दक्षता समित्या आहेत. बहुतांश दक्षता समित्या सदस्यांची बैठक घेऊन ठिकाणे निश्‍चित करीत आहेत. कोरोनाबाधित शहरातून आलेल्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्यासाठी शाळा, मंदिरांचा पर्याय शोधला जात आहे. 

दक्षता समित्यांनी गांभीर्याने घ्यावे 
लॉकडाउननंतर चाकरमानी गावाकडे परतल्यास त्यांना घराऐवजी बाहेरच क्वारंटाईन करावे लागणार आहे. सर्वांच्याच सहकार्याने कोरोनामुक्त तालुका म्हणून आजअखेर यश मिळविले आहे. आता कोरोना आला तर तो बाहेरून आलेल्यांकडूनच येईल. म्हणून लॉकडाउननंतर येणाऱ्या चाकरमान्यांविषयी गांभीर्याने घ्यावे लागेल. त्यांना बाहेरच क्वारंटाईन करण्याचे नियोजन करावे. काही गावांनी पर्याय शोधले आहेत. उर्वरित गावातील समित्यांनी अशा नियोजनाद्वारे सज्ज राहावे, असे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages Fear After Lockdown Kolhapur Marathi News