मुंबईकरांच्या सेवेसाठी गावे सरसावली 

अजित माद्याळे
Thursday, 28 May 2020

विकासात्मक वाटचालीत योगदान देत आपल्या मातीशी नाळ जोडलेले मुंबईकर आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत असल्याने गाव गाठत आहेत. दक्षता समितीच्या नियमावलींचे पालन करून ते शाळेत क्वारंटाईन झाले आहेत. या कालावधीत मुंबईकरांना काहीही कमी पडू नये या भावनेतून अख्खी गावे सरसावली आहेत. तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थही दक्षता समितीला साथ देत आहेत. यातून मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांमधील जिव्हाळ्याचे नाते जपण्याचा प्रयत्न होत आहे. 

गडहिंग्लज : विकासात्मक वाटचालीत योगदान देत आपल्या मातीशी नाळ जोडलेले मुंबईकर आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत असल्याने गाव गाठत आहेत. दक्षता समितीच्या नियमावलींचे पालन करून ते शाळेत क्वारंटाईन झाले आहेत. या कालावधीत मुंबईकरांना काहीही कमी पडू नये या भावनेतून अख्खी गावे सरसावली आहेत. तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थही दक्षता समितीला साथ देत आहेत. यातून मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांमधील जिव्हाळ्याचे नाते जपण्याचा प्रयत्न होत आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील बहुतांशी भाग रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. त्यातच शासनाने परवानगी दिल्याने मुंबईकर गावाकडे परतणार हे समजल्यानंतर सुरूवातीला स्थानिक ग्रामस्थांच्या मनात पाल चुकचुकायला लागली; परंतु प्रत्यक्षात हळूहळू जसे मुंबईकर गावाकडे येतील त्या पद्धतीने गावकऱ्यांनीही त्यांच्याशी मिळते जुळते घेण्याची मानसिकता केली. गावात पाणी असो वा शाळेचा प्रश्‍न, कोणत्याही संकट काळात गावाला तारणारे मुंबईकर कोरोनामुळे बेदखल होण्याची भीती व्यक्त होत होती. सुरूवातीला तशी परिस्थितीही होती; परंतु गावच्या विकासात हिरीरीने सहभाग नोंदवणाऱ्या मुंबईकरांना बेदखल कसे करायचे, ते काय दरोडेखोर आहेत काय ? ही भावना स्थानिक ग्रामस्थांमध्ये रूजली आणि अशा गावांकडून मुंबईकरांचे स्वागतच करण्यात आले. 

मुंबईकर आणि गावचे नाते तसे वेगळेच आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम आणि दक्षिण भागातील शेकडो तरुणांनी आपल्यासह कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई गाठली आहे. एकेका गावात अशा तरुणांची संख्या सरासरी 50 हून अधिक आहे. कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने हाताला काम नाही. परिणामी पोटासाठी संघर्ष करावा लागत असल्याने मुंबईकर "गड्या आपला गाव बरा' या भावनेतून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्‍यांत सुमारे दहा हजारांहून अधिक मुंबईकर गावाकडे परतले आहेत. मुंबईकर आले की, कोरोना वाढणार ही धास्ती गावकऱ्यांची होती.

झालेही तसेच; परंतु कोरोना आज आहे, उद्या नसेल; मात्र मुंबईकरांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते तोडायचे नाही हा निर्णय बहुतांशी गावांनी घेतला. दक्षता समितीने घालून दिलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईकरांचे प्रबोधन केले. गावात दाखल होताच थेट शाळेत संस्थात्मक क्वारंटाईनची सक्ती केली. त्याची काटेकोर अंमलबजावणीही त्यांनी केली.

कोरोनामुळे दुरावा निर्माण होण्याची भीती असतानाही आता मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थ गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कोरोनाशी मिळते जुळते घेऊनच जगायला शिकले पाहिजे याची मानसिकता लोकांनी तयार केली आहे. तर मग मुंबईकरांनी आमचे आणि गावचे काय वाईट केले आहे, या भावनेतून स्थानिक ग्रामस्थ त्यांना आपुलकीची वागणूक देत आहेत. हेच मुंबईकरांच्या मानसिक आधारासाठी गरजेचे होते. 

मुंबईकर स्थायिक होणार? 
चांगली नोकरी आणि पगार असलेले मुंबईकर परत कामावर रूजू होतील. कुटुंबासह मुंबईत असलेलेही आज ना उद्या परततील; परंतु मुंबईतही हातावर पोट असलेल्या काही तरुण चाकरमान्यांची मानसिकता वेगळी दिसत आहे. गावाकडची शेती आणि दुग्ध व्यवसायात मिळेल ते समाधान मानायचे, या भावनेतून ठराविक मुंबईकर आता गावीच स्थायिक होण्याच्या तयारीत असल्याचे काही गावातून सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villages Initiative To Serve Mumbaikars Kolhapur Marathi News