हलगी-घुमकं-कैताळाच्या ठेक्‍यावर रात्री जागायच्या... 

संदीप खांडेकर 
बुधवार, 8 जुलै 2020

बोडके गल्ली तालीम मंडळाची स्थापना 1890 ची. नाना फडतरे, श्रीपतराव मेथे, बाबूराव मेथे तालमीचे मूळ संस्थापक सदस्य. मर्दानी खेळाचा वारसा तालमीने जपला. लेझीमचा फेरही तालमीच्या प्रांगणात घुमायचा.

बोडके गल्ली तालीम मंडळाची स्थापना 1890 ची. नाना फडतरे, श्रीपतराव मेथे, बाबूराव मेथे तालमीचे मूळ संस्थापक सदस्य. मर्दानी खेळाचा वारसा तालमीने जपला. लेझीमचा फेरही तालमीच्या प्रांगणात घुमायचा. हलगी-घुमकं-कैताळाच्या ठेक्‍यावर रात्री जागायच्या. आट्या-पाट्यातही तालमीचा लौकिक होता. फुटबॉल खेळाडूही या परिसरात घडले. प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबमधून ते खेळले. गणेशोत्सव, मोहरम, त्र्यंबोलीत तालमीने सामाजिक ऐक्‍याचे दर्शन घडवले. 

मर्दानी खेळाचे रोपटे वस्ताद दिनकरराव मोरे यांनी तालमीत रूजवले. वस्ताद गंगाराम पाटील मूळचे उंदरवाडीचे. बिऱ्हाड घेऊन ते तालमीत परिसरात राहायला आले होते. फेकण्याचा त्यांना छंद. लेझीम खेळण्यातही त्यांचे नाव होते. मोरे वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद बाबासाहेब पोवार-लबेकरी, पंडित मोरे, गोपाळ मुळीक, सदाशिव सूर्यवंशी, मोहन साळोखे, मदन साळोखे, यशवंत भालकर, आनंदराव मुळीक घडले. आट्या-पाट्याच्या स्पर्धेत बोडके तालमीचे खेळाडू चमकायचे. अनेक स्पर्धांत शिल्ड मिळवून तालमीने आट्या-पाट्यांतील आपले वर्चस्व खूप वर्षे टिकवले. बालगोपाल, नंगीवली, उत्तरेश्‍वर व बजाराव माने तालीम आट्या-पाट्यांच्या स्पर्धेत उतरायची. तगडा प्रतिस्पर्धी म्हणून बजाराव माने तालीम बोडके तालमीसमोर असायची. 

बाबूराव लिमकर, बाबूराव गायकवाड, भालचंद्र गायकवाड, माधराव मुळीक, गंगाराम पाटील व आनंदराव मुळीक आट्या-पाट्यांतील नामांकित खेळाडू. अंगात रग टिकवून प्रतिस्पर्ध्यांवर भारी पडायचे. सायंकाळी सात ते रात्री नऊपर्यंत मर्दानी खेळाचा सराव तालमीच्या दारात सुरू असायचा. आट्या-पाट्याचा खेळ त्यांनतर रंग भरायचा. 
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाळा-शाळांत मिठाई वाटपाचा कार्यक्रम सुरू असायचा.

सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन सण साजरे करायचे. बोडके तालमीतही सामाजिक ऐक्‍याची किनार होती. गणेशोत्सव धुमधडाक्‍यात साजरा करताना त्याला प्रबोधनाचा झालर दिली जायची. महागाई, भ्रष्टाचारावर आधारीत देखावे साजरे केले जायचे. मोहन, विक्रम व बाबा सावंत या बंधूंचा गणेशोत्सवात हिरीरीने पुढाकार असायचा. त्यात आजही खंड पडलेला नाही. मोहरममध्ये हिंदू-मुस्लिम धर्मीय तालमीत आजही एकत्र येतात. राजबक्ष पंजासमोर नतमस्तक होतात.

फुटबॉलमध्येही तालमीचे खेळाडू भारी होते. गोपीनाथ मुळीक, पंडित मोरे, बाबासाहेब बोंगाळे, अशोक पोवार, बाळ दामुगडे, अशोक मुळीक, दत्ता लिमकर, विठ्ठल जाधव, पांडू पोपले प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबमधून खेळले. आजही तालमीने मर्दानी खेळाचा वारसा जपला आहे. वस्ताद बाबासाहेब पोवार-लबेकरी वयाच्या पंचाहत्तरीतही नव्या पिढीला मर्दानी खेळाचे धडे देत आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती असो की वरात मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके ते हमखास सादर करतात. मोहन सावंत वयाच्या 79 व्या वर्षी तालमीच्या जमा-खर्चावर बारीक लक्ष ठेवून आहेत. 

तालमीची कार्यकारिणी... 
वस्ताद बाबासाहेब पोवार-लबेकरी (अध्यक्ष), अशोक जाधव (उपाध्यक्ष), मोहन सावंत (खजिनदार), मोहन साळोखे (सचिव), अशोक पोवार (लेखापरीक्षक), रामभाऊ चव्हाण, पंडित मोरे, संजय नार्वेकर, सदाशिव सूर्यवंशी, मदन पोवार, प्रकाश सूर्यवंशी, राहूल संकपाळ, जनार्दन पोवार, अमित साळोखे, निवास शिंदे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Want to wake up at night on a halgi-ghumkam-kaitala ...