कोल्हापूर जिल्हातील या 23 गावात पाणी टंचाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

एप्रिल सुरू झाला असून, उन्हाच्या तीव्र झळाही जाणवत आहेत. दुसऱ्या बाजूला विहिरींसह जंगलातील झऱ्यांचेही पाणी कमी होत आले आहे. टंचाई जाणवण्यास काही गावांत सुरवात झाली आहे. पाणीटंचाई जाणवू लागल्याने अनेक गावांनी जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बोअरवेलसाठी प्रस्ताव दिले आहेत.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाईच्या उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत 
8 तालुक्‍यांतील 23 गावांत बोअरवेलची मागणी केली आहे. त्याची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत या प्रस्तावांची छाननी होणार आहे. काही गावांनी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषदेतून ही बोअरवेल घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

एप्रिल सुरू झाला असून, उन्हाच्या तीव्र झळाही जाणवत आहेत. दुसऱ्या बाजूला विहिरींसह जंगलातील झऱ्यांचेही पाणी कमी होत आले आहे. टंचाई जाणवण्यास काही गावांत सुरवात झाली आहे. पाणीटंचाई जाणवू लागल्याने अनेक गावांनी जि. प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे बोअरवेलसाठी प्रस्ताव दिले आहेत. राधानगरी तालुक्‍यात झऱ्यावरील पाणी योजनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच हे पाणी एप्रिल, मेमध्ये कमी होऊन टंचाई जाणवते. या तालुक्‍यातील आडोली, चाफोली, राजापूरसह आठ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. भुदरगड, करवीर तालुक्‍यांत प्रत्येकी एका गावात पाणीटंचाई आहे, तर अजूनही शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यातून टंचाईचा प्रस्ताव आलेला नाही. 

तालुका * गावाचे नाव 
*भुदरगड* पुष्पनगर 
*राधानगरी * आडोली, चाफोडी, ऐनघोळ, राजापूर, कारिवडे, पडसाळी, कोते, पाठपन्हाळा, सावर्दे. 
*चंदगड * इसापूर, कोदाळी. 
*करवीर * बोलोली. 
*पन्हाळा* निकमवाडी, बोरिवडे, बुधवारपेठ (2). 
*आजरा * उचंगी, सरंबळवाडी. 
*गडहिंग्लज* शिप्पूर तर्फ आजरा (2), लिंगनूर क. नूल. 
*शाहूवाडी * करंजोशी, कोतोली. 

नळ-पाणीपुरवठा दुरुस्ती, विहीर खोलीकर 
भुदरगड तालुक्‍यातील देवर्डे येथील दलितवस्ती, हणबरवाडी येथील देसाई वस्ती, नवरसवाडी पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचा प्रस्ताव आला आहे. चंदगडच्या मिरवेल, नामखेल येथील योजनेच्या दुरुस्तीसह राधनगरीच्या कारिवडे राऊतवाडी येथे तात्पुरती पूरक नळ योजनेचा प्रस्ताव आला आहे. 

टंचाईच्या कामांबाबत ग्रामपंचायतीचे प्रस्ताव येत आहेत. 23 गावांनी बोअरवेलची मागणी केली आहे. याची भौतिक पाहणी केली आहे. कागदपत्रे छाननी आणि प्रस्ताव पूर्ण करण्यात येत आहेत. काही दिवसांत हे प्रस्ताव पूर्ण होऊन बोअरवेल मारण्यात येतील. काही गावांनी त्यांच्या निधीतूनच बोअरवेल घेण्याचे नियोजन केले आहे. याठिकाणी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल. 
- मनीष पवार, प्र. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage playing 23 villages