
उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे भूतकाळात पाण्याचे स्रोत कसे व कुठे होते याबाबत उत्तूर विद्यालयातील शिक्षक अशोक शिवाजी जाधव यांनी माहितीपट बनविला आहे. याचे अनावरण सरपंच वैशाली आपटे व जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे यांच्या उपस्थितीत झाले.
या माहितीपटात 1970 ते 1990 काळातील गावतलावासह दहा ठिकाणी पाण्याचे जुने स्रोत होते. यापैकी काही स्रोत आजही सुरक्षित आहेत. नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणचा वापर करतात. पाच एकर क्षेत्रात गावतलाव आहे. गावच्या पूर्वेला वडभाव आहे. याशिवाय नाईकवाड्यांची विहीर, हरिजन बांधवांची विहीर, लक्ष्मी मंदिरजवळील आड भाव, दत्त मंदिर, कंठास्वामी, दड्डीकर, गोपाळराव सोनवडेकर, अमोल देशपांडे, फडणवीस यांच्या परिसरात असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना या माहितीपटात उजाळा दिला आहे.
पूर्वी पाण्याच्या दुर्भिक्षाचा कालखंड, पाण्यासाठी पाणवठ्यावर असलेली माणसांची वर्दळ, चुंबळीच्या आधारे डोक्यावर एक व काखेत एक घागर घेऊन जाणाऱ्या महिलांची धावपळ, मातीच्या, पत्र्याच्या, तांब्याच्या, पितळेच्या घागरी यांचे वर्णन यामध्ये चित्रित केले आहे.
गावतलावाच्या रहाटाची दिशा, धोबीघाट याचा त्या काळी होणारा वापर, विहिरीने तळ गाठल्यावर पाणी भरण्यासाठी होणारी घालमेल, जलसमाधी घेतलेली घागर गळाने काढण्याची पद्धत, याबाबत सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सायकलची चाके जोडून तयार झालेल्या पाण्याच्या गाड्याची जन्मकथा यामध्ये दाखवली आहे.
चांगला प्रतिसाद
उत्तूरमधील पाण्याची पूर्वीची स्थिती नव्या पिढीला कळावी यासाठी माहितीपटाची निर्मिती केली. या माहितीपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- अशोक जाधव, माहितीपटाचे निर्माते-दिग्दर्शक
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.