लग्नाला गेले आणि क्वारंटाईन झाले

महादेव वाघमोडे
गुरुवार, 9 जुलै 2020

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे कोरोनाचा कहर सुरू असून, आज आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांचा आकडा दहा झाला आहे. पैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज दिला असून, अद्याप नऊ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

उजळाईवाडी  ः गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे कोरोनाचा कहर सुरू असून, आज आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांचा आकडा दहा झाला आहे. पैकी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज दिला असून, अद्याप नऊ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

टॅंकरचालक कोरोनामुक्त झाल्यानंतर महिनाभर रुग्ण न सापडल्याने ग्रामस्थ कामात मग्न असतानाच कोल्हापूर एसटी आगारात कार्यरत असणाऱ्या व येथे राहणाऱ्या व्यक्तीचा बाधिताशी संपर्क आल्याने त्याला क्वारंटाईन केले होते. त्याचा अहवाल चार जुलैला पॉझिटिव्ह आला. यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या त्याची आई, वडील, पत्नी व भावजयीचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ माजली. अशातच आज एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या कोरोना बाधिताच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून केआयटी कॉलेजपासून म्हसोबा माळपर्यंतचा भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील केला आहे. 
सरपंच एम. के. पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीच्या वैद्यकीय अधिकारी भूषण मस्के, गोकुळ शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, नाईक राकेश माने, कर्मचारी, आशासेविका व अंगणवाडीसेविका विशेष परिश्रम घेत आहेत. कुटुंबीयांचे सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कॉलनीतील 84 जण तपासणीला 
बाधित एसटी कर्मचाऱ्याच्या कॉलनीमध्ये दरम्यानच्या काळात एक धार्मिक तसेच लग्नसमारंभ झाला होता. या कार्यक्रमात संसर्गित कुटुंबीयांनी सहभाग घेतल्याने अनेकांना संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपर्कात आलेल्या चोवीस कुटुंबांतील 84 जणांना तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविले आहे.

संपादन - रंगराव हिर्डेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Went to the wedding and was quarantined